उगीच नाही म्हणत ‘अपना भिडू बच्चू कडू’ , शेतकऱ्याला थेट मंचावर बोलवून आपल्या जागेवर बसवलं !

अकोला : बच्चू कडू सध्या राज्याचे शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार अशा अनेक लांबलचक खात्यांचे राज्यमंत्री आहेत. मात्र, बच्चू कडू यांची याआधी एक ओळख आहे. ही ओळख आहे ‘आंदोलक नेता’, फायरब्रँड लोकप्रतिनिधी आणि संवेदनशील माणूस अशी. एका पक्षाचा अध्यक्ष, राज्यमंत्री झाल्यावरही हा माणूस स्वत:ला नेता मानत नाही. कारण, त्यांना आपली ओळख आवडते ती ‘कार्यकर्ता’ म्हणून…

आज त्यांच्या एका साध्या कृतीनं मंत्रीपदाच्या ‘प्रोटोकॉल’च्या धबडग्यातही त्यांच्यातील ‘कार्यकर्ता’ तसाच जीवंत असल्याचं दिसलं. त्यांच्या या साध्या अन् सहज वागण्यानं उपस्थितांची मन तर जिंकलीतच. परंतु, ज्याला हा अनुभव आला, त्याला पार गहिवरून आलं अन तो नि:शब्दही झाला.

ही घटना घडली अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातल्या जांभा खुर्द गावात. अन् याला निमित्त होतं बच्चू कडूंनी आज अकोला जिल्ह्यातून सुरू केलेल्या ‘कर्तव्य यात्रे’चं. यात त्यांनी आज संपुर्ण शासकीय यंत्रणा गावात नेत अनेक योजना आणि प्रमाणपत्रं नागरिकांना ‘ऑन दी स्पॉट’ दिलीत. यावेळी बच्चू कडू भाषण करीत असतांना लक्ष्मण सोळंके नावाचा वृद्ध व्यक्ती गर्दीतून आपली कैफियत मांडत होता. यावेळी राज्यमंत्री कडू यांनी या व्यक्तीला सन्मानानं व्यासपीठावरील आपल्या जागेवर बसवलं. व्यासपीठावर थेट राज्यमंत्री आणि जिल्हाधिकऱ्यांच्या मधात स्थान मिळाल्यानं हा वृद्ध शेतकरी मात्र नि:शब्द झाला.