सुषमा अंधारेंमुळे नाराजी होती का? शिंदे गटातील प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे म्हणाल्या…

Neelam Gorhe Joins Shivsena: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे. आता उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसला असून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही  उपस्थित होते. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी पक्षप्रवेशामागची आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी आपण उपसभापतीपदी कायम राहून काम करत राहणार असल्याचं त्या म्हणाल्या. मी उपसभापतीपदी असल्यामुळे त्या पदाच्या चौकटीत राहूनच मी काम करणार आहे, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, सुषमा अंधारेंच्या (Sushma Andhare) शिवसेनेतील प्रवेशामुळे महिला आघाडीत नाराजी होती का? यासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा रंगली आहे. यावर नीलम गोऱ्हेंनी खोचक टिप्पणी केली. आमच्या पक्षात नाराजी वगैरे कुठेच नसतं. नाराजी असली, तरी पक्षाचे नेते आले की सगळे नाराजी विसरत असतात. सटर-फटर लोकांमुळे नाराज होण्याची काही परिस्थिती नाहीये, असं नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.