नितेश राणेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होणार?

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurga District Court) फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांना हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, असं असलं तरी नितेश राणे आता उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

कोर्टाची सुनावणी संपल्यानंतर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. हायकोर्टात जाण्याचा नक्कीच एक पर्याय आहे. आम्ही चर्चा करुन निर्णय घेऊ. शक्यतो आम्ही हायकोर्टातच जाऊ. मोबाईल फोन जप्त करायचे आहेत. त्यासाठी कस्टडीची गरज असल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं आहे. या व्यतिरिक्त कोणतंही कारण सांगितलेलं नाही असं ते म्हणाले.

हायकोर्टात याप्रकरणी उद्या अर्ज दाखल करु. मध्ये शनिवार-रविवार सुट्टी असल्याने निश्चितच सोमवारी किंवा मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी होईल. अटकपूर्व जामीनासाठी आम्ही कोर्टात अर्ज केला आहे. त्यामुळे आम्हाला अटकेपासून दूर राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे. हायकोर्टात जायचं नसेल तर आमच्याकडे सरेंडर होण्याचा पर्याय आहे. याशिवाय नितेश राणे यांनी पोलिसांना तपासात पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. यापुढेदेखील आम्ही मदत करु, असं वकील संग्राम देसाई यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण ?
शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते संतोष परब यांनी आपल्याला मारहाण झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच, आपल्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीने नितेश राणेंचं नाव घेतल्याचं देखील त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. त्यामुळे संतोष परब यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीत नितेश राणेंचं नाव देखील आलं आहे.