आयपीएल २०२३ पूर्वी केकेआरने बदलला कर्णधार, श्रेयस अय्यरच्या जागी ‘या’ भारतीय खेळाडूची वर्णी

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. केकेआरने श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत 29 वर्षीय नितीश राणाकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. श्रेयस अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे आणि संपूर्ण आयपीएल 2023 हंगामातून तो बाहेर पडण्याची शक्यता आहे. कोलकाताला आयपीएल 2023 मधील पहिला सामना 1 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध खेळायचा आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने आशा व्यक्त केली आहे की श्रेयस आयपीएल 2023 मधील काही सामन्यांसाठी नक्कीच उपलब्ध असेल. केकेआरने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही भाग्यवान आहोत की नितीशला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपल्या राज्याचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे आणि तो 2018 पासून केकेआरशी जोडला गेला आहे, आशा आहे की तो चांगली कामगिरी करेल.’

केकेआरने पुढे म्हटले आहे की, ‘आम्हाला विश्वास आहे की मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि सपोर्ट स्टाफच्या नेतृत्वाखाली नितीश राणाला मैदानाबाहेर सर्व आवश्यक सहकार्य मिळेल. यासोबतच संघातील अनुभवी खेळाडू त्याला पूर्ण पाठिंबा देतील, ज्याची नितीशला मैदानावर गरज भासू शकते. आम्ही त्याला त्याच्या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा देतो आणि श्रेयसला पूर्ण आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.’

नितीश राणा असेल केकेआरचा आठवा कर्णधार:
1. सौरव गांगुली – 27 सामने, 13 विजय, 14 पराभव
2. ब्रेंडन मॅक्क्युलम – 13 सामने, 3 विजय, 9 पराभव, 1 बरोबरी
3. गौतम गंभीर – 122 सामने, 69 विजय, 51 पराभव, 1 बरोबरी, 1 निकाल नाही
4. जॅक कॅलिस – 2 सामने, 1 विजय, 1 पराभव
5. दिनेश कार्तिक – 37 सामने, 19 विजय, 17 पराभव, 1 बरोबरी
6, इऑन मॉर्गन – 24 सामने, 11 विजय, 12 पराभव, 1 बरोबरी
7. श्रेयस अय्यर – 14 सामने, 6 विजय, 8 पराभव