‘दोन दिवसांत कामावर रुजु व्हा, नाहीतर निलंबीत कर्मचाऱ्यांवर कायमस्वरुपी बडतर्फीची कारवाई होणार’

मुंबई : गेल्या 17 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने एक पाऊल पुढे येत एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक पगारवाढीनंतरही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठी घोषणा केल्यानंतरही संपावर तोडगा निघाला नाही. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्के वाढ करणार असल्याची घोषणा केलीय.

त्यानंतर आता आझाद मैदानावर सुरु असणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. दरम्यान, आता एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. आज आणि उद्या दोन दिवसांत कामावर रुजु व्हा, नाहीतर परवापासून निलंबीत कर्मचाऱ्यांवर कायमस्वरुपी बडतर्फीची कारवाई होणार आहे.

जे कर्मचारी निलंबीत झालेत ते कामावर रुजू झाल्यास निलंबन मागे घेण्यात येणार आहे. मात्र, परवापासून कामावर रुजु न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. संपावर असलेल्या मात्र, निलंबनाची कारवाई न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधातही परवापासून कारवाई करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.