मोहीत कंबोज यांनीच तीन बँकांना चुना लावला” रोहित पवारांचं प्रत्युत्तर

मुंबई – राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच जेलमध्ये जाणार असं ट्वीट करून भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj Bharatiya) यांनी खळबळ उडवून दिली होती. आता मोहित कंबोज यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडे वळवला आहे. रोहित पवार (rohit pawar) यांच्याबद्दल अभ्यास करत असल्याचा इशाराच कंबोज यांनी दिला. मोहित कंबोज यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीच्या (NCP) मोठ्या नेत्याबद्दल भाकीत वर्तवलं होतं. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी आमदार रोहित पवार यांच्या बाबतीत सूचक ट्विट केलं आहे.

“बारामती ॲग्रो लिमिटेड (Baramati Agro Ltd) कंपनीचा मी सखोल अभ्यास करतोय. त्या संदर्भातील अधिकचे अपडेट लवकरच देईल”, असं ट्विट कंबोज यांनी केलं आहे. त्यामुळे कंबोज यांनी काही दिवसांआधी इशारा केलेला ‘राष्ट्रवादीचा बडा नेता’ रोहित पवार आहेत का? असा प्रश्न विचारला जातोय.

दरम्यान, कंबोज यांनी केलेल्या या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता  रोहीत पवार यांनीदेखील मोहीत कंबोज यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. मोहीत कंबोज यांनी सामान्य नागरिकांचा पैसा असलेल्या दोन-तीन बँकांना चुना लावला आहे, त्यामुळे त्यांच्या ट्वीटला किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

रोहित पवार म्हणाले की, “जेव्हा त्यांनी ट्वीट केले, तेव्हाच मी मोहीत कंबोजबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओव्हरसीज बँकेत ५२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा विषय चर्चेत आहे. त्याचबरोबर त्यांनी अजून दोन-तीन बँकांना चुना लावला आहे. सामान्य लोकांचा पैसा ज्या बँकेत असतो, त्याच बँकेला त्यांनी चुना लावला असेल तर त्यांच्या ट्वीटला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.