महामोर्चाला जाण्यापूर्वी रुपाली ठोंबरे यांची राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका; म्हणाल्या, …

पुणे: महापुरुषांच्या सातत्याने होत असलेल्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चासाठी पुण्यातून मुंबईकडे जाताना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यपालांविरोधात भाजपने काळे झेंडे का दाखवले नाही. भाजप फक्त सोयीचं राजकारण करत आहे, अशी टीका करतानाच मनसेचे नेते राज ठाकरे हे राज्यपालांच्या विधानावर गप्प का बसले? असा सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे.

मनसेची परिस्थिती म्हणजे काय सोडायचं आणि काय धरायचं अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की… म्हटल्यानंतर ज्यांच्या तोंडून आपोआप जय असा उच्चार निघतो, असे लोक देखील राज्यपालांच्या विधानावर काहीच बोलले नाहीत, असा अशी जहरी टीका रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील महापुरुषांचा राज्यपाल व भाजपा नेत्यांकडून सातत्याने होत असलेल्या अपमानाविरुद्ध आज महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. मुंबईतील भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.