श्री गणेश व देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा थाटात

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे अक्षयतृतीयेच्या दिवशी आयोजन

पुणे : भगवान श्री गणेशांसोबत देवी शारदेच्या महामिलनाचा सोहळा असलेला श्री शारदेश मंगलम विवाह सोहळा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात थाटात पार पडला. सनई चौघडयाचे मंगल सूर, अक्षतांसह फुलांची उधळण आणि पारंपरिक वेशात भाविकांची मोठया संख्येने मंदिरातील उपस्थिती असे विलोभनीय दृश्य अक्षयतृतीयेच्या दिवशी मंदिरामध्ये अनुभवायला मिळाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम् सोहळा मंदिरात थाटात पार पडला. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी लग्नसोहळ्याचे पौरोहित्य केले.

सभामंडपात लग्नसोहळ्यातील सर्व धार्मिक विधींसह मंगलाष्टके झाली. फुलांनी मंदिरात आकर्षक सजावट देखील करण्यात आली. श्री गणेशांच्या दोन शक्तींना गाणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने आळविले जाते. भगवंताच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात, तर भगवंताच्या ज्ञान शक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू असल्याने या काळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे म्हणतात.

शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता, आल्हाददायकता असल्याने तिला शारदा असे म्हणतात. शरद ऋतू मधील प्रसन्नतेप्रमाणे देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा असे म्हणतात. अशा देवी शारदेचा भगवान श्री गणेशांसोबतच्या महामीलनाचा सोहळा म्हणजे श्री शारदेश मंगलम आहे.