ज्या झाडाने सावली दिली, त्याच झाडावर घाव घालताना शिंदेंना काहीच वाटलं नाही?

मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे (Bow & Arrow) निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andhrei East Bypoll Election) शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

ज्या झाडाने सावली दिली, ज्याची फळे चाखली, त्याच झाडावर घाव घालताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) तुम्हाला काहीच वाटलं नाही का? असा प्रश्न शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. याबरोबरच कुऱ्हाड देणारे हात भाजपचे असल्याचा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केलाय.

सध्या मेरी लाठी मेरी बैसे असा प्रकार चालू आहे. आपल्याला अनुकल असणारे निर्णय घेतले जात आहेत. अंधेरी निवडणुकीमुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. परंतु, तुम्ही खरचं शिवसेना वाचवण्यासाठी निघाला असाल तर जी जागा मूळ शिवसेनेची आहे, ती भाजपासठी कशी सोडलीत? शिंदे गटाने ती जागा का लढवली नाही?  असे प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केलाय.