अभिनेता सुधीर वर्माच्या आत्महत्येने हादरली साऊथ इंडस्ट्री, अवघ्या ४३व्या वर्षी संपवले जीवन

दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील अभिनेता सुधीर वर्मा (Sudheer Varma) याने काल (२३ जानेवारी) त्याच्या राहत्या घरी विशाखापट्टणम येथे आत्महत्या केली (Sudhir Varma Suicide) आहे. तो ४३ वर्षांचा होता. सुधीर वर्माने उचललेल्या या धक्कादायक पाऊलाने तेलुगू सिनेसृष्टी हादरली आहे. सुधीर वर्माच्या आत्महत्येबाबत त्याचा सह-कलाकार सुधाकर कोमाकुला आणि दिग्दर्शक वेंकी कुदुमुला यांनी पुष्टी केली आहे.

तेलुगू चित्रपटांचे दिग्दर्शक वेंकी कुदुमुला यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “कधीकधी सर्वात सुंदर हास्य खूप वेदना लपवते… तू असे करायला नव्हते पाहिजे… तुझ्या आत्म्याला शांती लाभो.” या बातमीमुळे साऊथ इंडस्ट्रीत दुःखाची लाट उसळली आहे.

तसेच सुधीर वर्माचा सह कलाकार व अभिनेता सुधाकर कोमाकुलानेही ट्विटरवर त्याचे फोटो शेअर करून दुःख व्यक्त केले आहे. त्याने लिहिले, “सुधीर! इतकी सुंदर व्यक्ती… तुला ओळखून आणि तुझ्यासोबत काम करून खूप आनंद वाटला. विश्वास बसत नाही की तू आता या जगात नाहीस. ओम शांती.”

सुधीर वर्माच्या निधनाची बातमी समजताच साऊथ इंडस्ट्रीतील अनेक लोक सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. त्याने आत्महत्येसारखे मोठे पाऊल का उचलले?, हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान सुधीरने २०१३ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सुधीरचा पहिला चित्रपट ‘स्वामी रा रा’ होता. यानंतर त्याने एकापाठोपाठ एक चित्रपट केले. मात्र २०१६ मध्ये आलेल्या ‘कुंदनापू बोम्मा’ या चित्रपटातून त्याला प्रसिद्धी मिळाली होती.