सहकारी विद्यापीठ स्थापनेचा विचार व्हावा : आ.सुभाष देशमुख

सोलापूर : गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच सहकार विषयावर बोलताना, सहकारी विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना मांडली आहे. तसे एखादे सहकारी विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन व्हायला काही हरकत नाही. आपण तसे प्रयत्न केले पाहिजेत अशी कल्पना लोकमंगलचे प्रणेते आमदार सुभाष बापू देशमुख यांनी गांधी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन चर्चासत्रात बोलताना मांडली.

लोकमंगल फाऊंडेशन आणि सहकारी पतसंस्था यांच्या शिक्षकरत्न पुरस्कारांना आता १५ वर्षे होत आहेत. या निमित्ताने आजवर हा पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना पाचारण करून त्यांची मते जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या चर्चेत सोलापुरात कृषि विद्यापीठ असावे असे मत व्यक्त करण्यात आले होते. त्याला उत्तर देताना आमदार सुभाष बापूंनी सहकारी विद्यापीठाची कल्पना मांडली.

या चर्चासत्रात शिक्षकरत्न पुरस्कार समितीचे सदस्य डॉ. ह. ना. जगताप, डॉ. देवानंद चिलवंत, आशालता जगताप हे उपस्थित होते. अनिल पाटील यांनी क्रीडा विकासा विषयी मत मांडले. सोलापूर ,जिल्ह्यातल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे असे मत मांडले. तर डॉ. नीलिमा माळगे यांनी, जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांना काढणी पश्‍चात तंत्रज्ञान शिकवून धान्याची आणि फळे भाजीपाला यांची नासाडी टाळावी अशी सूचना केली.

डॉ. ह. ना. जगताप यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी चांगल्या शाळांना भेटी देऊ तिथे चालणार्‍या उपक्रमांची माहिती करून घ्यावी असे आवाहन केले. शिक्षकांप्रमाणेच गावातल्या गरीब, उपेक्षित पण गुणवंत कामगारांसाठी पुरस्कार देण्याची योजना सुरू करावी असा प्रस्ताव दिला. अशा सत्काराने श्रम करणारांची प्रतिष्ठा वाढेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्राचार्य धनंजय शहा यांनी पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले तर शहाजी ठोमरे यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषयक सोयी व्यापक कराव्यात असे आवाहन केले. परवेज शेख, श्री. घाडगे, शरणप्पा फुलारी यांनीही अनेक उपयुक्त सूचना मांडल्या. प्रा. चिलवंत यांनी गावागावात ग्रंथालयांच्या सोयी वाढवाव्यात आणि शिक्षकांनी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले. चर्चेचे संचालन अरविंद जोशी यांनी केले.

हे ही पहा: