महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं; कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याचे सूचक वक्तव्य 

नवी दिल्ली – ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले असून पंजाब वगळता ४ राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. भाजप आप आणि समाजवादी पार्टी वगळता कोणत्याही पक्षाला या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आलेली नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तर खूपच बिकट अवस्था असून नोटा पेक्षा देखील कमी मते या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळाली आहेत.

दरम्यान, मानहानीकारक पराभव स्वीकाराव्या लागणाऱ्या या दोन पक्षांची डोकेदुखी इथेच थांबणार नसल्याचे दिसत आहे कारण आता काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्यानेच ठाकरे सरकार कधीही पडू शकतं, असं म्हटलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्राचं सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं, असं विधान काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी केलं आहे. विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात केतकरांनी आपली भीती व्यक्त केली. महाराष्ट्रातील सरकार पडण्याची भीती वाटते का असा प्रश्न चर्चेवेळी केतकरांना विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले ज्या क्षणापासून हे सरकार स्थापन झाले आहे त्या क्षणापासूनच ही भीती आहे की महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं.

कुमार केतकर नेमकं काय म्हणाले?

ज्या क्षणापासून हे सरकार स्थापन झाले आहे त्या क्षणापासूनच ही भीती आहे की महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं. भाजप हा अत्यंत साधनशूचिता असणारा पक्ष आहे. कर्नाटकमध्ये काय झालं, मध्यप्रदेशात काय झालं हे पाहिलं की लक्षात येतं. ज्यावेळी तथाकथित लोटस कॅंपेनमध्ये लोक स्वतःच राजीनामा देतात आणि निवडणुकीत बहुमत मिळालेल्या सरकारला जुमानत नाहीत आणि पुन्हा निवडून येतात. हे सर्व कसं रीतसर, घटनात्मक पद्धतीने होतं, असं कुमार केतकर यांनी सांगितलं.