बीडमध्ये ओबीसी बांधवांच्या घरावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट – मंत्री छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: मी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विरोधात नाही, मात्र ओबीसी (OBC) मधल्या लहान घटकावर अन्याय होऊ देणार नाही. राज्यातल्या ओबीसी समाजावर अन्याय करण्याची भूमिका कोणीही घेऊ नये असे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे.

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौरा केला यामध्ये त्यांनी मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान जाळपोळ झालेल्या बीड जिल्ह्यात आ.प्रकाश सोलंकी,जयदत्त क्षिरसागर,आ.संदिप क्षिरसागर,माजी आमदार अमरसिंग पंडित यांच्या निवासस्थानी तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष ऍड सुभाष राऊत यांच्या हॉटेलची पाहणी केली.

यावेळी ते म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण हवे आहे त्याला आमचा विरोध नाही मात्र ते स्वतंत्रपणे दिले पाहिजे. गरीब ओबीसी घटकांमधून दिल्यास मोठा अन्याय होईल. स्वतंत्र आरक्षणासाठी ज्या ज्या वेळी मागणी झाली त्या त्या वेळी मी पाठींबा दर्शविला आहे. अनेक वेळा राज्याच्या विधिमंडळात देखील भूमिका मांडली आहे. पुढे देखील स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी झाली तर आम्ही निश्चितपणे मराठा समाजासाठी लढू मात्र अश्या पद्धतीने मागच्या दरवाज्याने सरसकट प्रवेश दिला जात असेल तर त्याला आमचा विरोध असेल. ज्या जालना जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मेळाव्या मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी ओबीसी घटकांना आरक्षण देण्याची मागणी केली त्याच जालना जिल्ह्यातून ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा घाट घातला जात आहे. ओबीसी समाजाने आता एकत्रित होऊन लढण्याची गरज आहे. मी कुठल्याही एका जातीचे प्रतिनिधित्व करत नाही तर राज्यातील ३७५ पेक्षा अधिक असलेल्या लहान लहान घटकाचे मी प्रतीनिधित्व करतोय. त्यामुळे ओबीसी समाजासाठी मी नेहमीच लढत राहील. सरकार मध्ये असलो तरी देखील याविरुद्ध लढेल असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की आरक्षण मागणीसाठी बीड जिल्ह्यात आंदोलन झाले. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. समता परिषदेच्या सुभाष राऊत यांच्या हॉटलेवर हल्ला करण्यात आला. मोठ मोठे कोयते, पहारी, हत्यारे घेऊन हल्ला करण्यात आला. संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंकी यांच्याघरावर हल्ला झाला तेंव्हा देखील अश्याच पद्धतीने हल्ला करण्यात आला. बीड मध्ये झालेला हा हल्ला म्हणजे ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता आणि ही मराठा समाजाची उस्फुर्त प्रतिक्रिया नसून हा पूर्वनियोजित कट होता. अनेक ठिकाणी तर आंदोलन करताना सांकेतिक नंबर देऊन हल्ला करण्यात आला. आणि ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्यापैकी किती लोक विरोधात बोलले होते पण तरी देखील हल्ला करण्यात आला. बीड मध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची देखील तोडफोड बीड मध्ये करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचे नाव घेऊन त्यांच्याच प्रतिमेची तोडफोड होत असेल तर ते आम्ही कसे सहन करायचे. ज्यांच्या ज्यांच्या घरावर हल्ले झाले, कार्यालयावर हल्ले झाले, हॉटेल जाळण्यात आली त्यांना सरकारने याची नुकसान भरपाई देखील दिली पाहिजे.

आम्ही मराठा समाजाच्या विरोधात बोललो नाही जी भूमिका पवार सहेबांपासून सर्वांनी मांडली तीच भूमिका आमची आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्या. बीड मध्ये हल्ला करण्यात आला त्याचे गुन्हे मागे घेण्याची भाषा आज केली जात आहे मात्र त्यावेळी पोलीस हतबल का होते याचे उत्तर अजुनही मिळाले नाही. जालना मध्ये पोलिसांवर देखील हल्ला झाला होता. महाराष्ट्रातील पोलीस उगीच लाठीचार्ज करत नाही. ७० पोलीस जखमी झाले असे स्वतः येथील पोलीस अधीक्षक श्री. दोषी यांनी माध्यमांना सांगितले होते. त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. मात्र त्यांचे गुन्हे मागे घेतले जात आहे त्यामुळे पोलिसांचे मनोबल खचले जाऊ शकते. असे मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

ते म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावर कुणी मतांच राजकारण करत असेल तर ओबीसी समाज देखील गप्प बसणार नाही तेही आपली निर्णायक भूमिका पार पाडतील. आरक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल, सर्व समाजाला त्यांचं न्याय हक्क अबाधित ठेवायचे असतील तर जातनिहाय जनगणना करण्यात यावी. त्यातून सर्व समाजाची आकडेवारी समोर येऊन आरक्षणाचा लाभ देता येईल अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.

महत्वाच्या बातम्या-

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण