पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी दोन कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

पुणे : पुणे प्रादेशिक विभागात वीजचोरांविरुद्ध महावितरणने कठोर कारवाई सुरु केली असून चौथ्या एकदिवसीय विशेष मोहिमेत १४४५ ठिकाणी २ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांच्या वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर उघडकीस आणला आहेत. वीजचोरीविरुद्धच्या नियमित कारवाईसोबतच आतापर्यंत एकूण चार एकदिवसीय विशेष मोहिमेत ६४२८ ठिकाणी ७ कोटी ७१ लाख ४५ हजार रुपयांच्या अनधिकृत वीजवापराचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

महावितरणची वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा या जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी वीजचोऱ्यांचा शोध घेणे व त्याविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक (प्र.)  अंकुश नाळे यांनी दिले आहेत. त्यानुसार संपूर्ण प्रादेशिक विभागातील सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांचे शेकडो पथके महिन्याच्या एका दिवसात एकाच वेळी पाचही जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करीत आहेत. तसेच वीजचोरी व दंडाची रक्कम न भरणाऱ्या चोरट्यांविरुद्ध विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

पुणे प्रादेशिक विभागात शनिवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता पाचही जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वीजजोडण्यांची तपासणी सुरु झाली. दिवसभरात १२ हजार ४१० वीजजोडण्यांच्या तपासणीमध्ये १४४५ ठिकाणी वीजचोरी व विजेचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळून आले. यामध्ये सुमारे १४ लाख ६० हजार ५८० युनिटची म्हणजे २ कोटी ७ लाख १३ हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर झाल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांना चोरी केलेल्या युनिट व दंडाचे वीजबिल देण्यात येत आहे. हे वीजबिल व दंड भरला नाही तर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यात ५५१ ठिकाणी १ कोटी ६२ लाख ३२ हजार, सातारा- १२३ ठिकाणी ९ लाख ८१ हजार, सोलापूर- ६७० ठिकाणी २२ लाख ४८ हजार, कोल्हापूर- ४१ ठिकाणी ६ लाख १५ हजार आणि सांगली जिल्ह्यात ६० ठिकाणी ६ लाख ८० हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघड झाला आहे.

चोरीद्वारे इतर ठिकाणाहून आकडे किंवा केबल टाकून वीज वापर करताना स्वतःच्या, घरातील लहानमोठ्या व्यक्तीच्या किंवा परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जीवघेणा अपघाताची शक्यता असते. त्यामुळे विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजजोडणीसाठी अर्ज केल्यानंतर मागेल त्यांना अधिकृत वीजजोडणी देण्यात येत आहे. तसेच ज्या ग्राहकांचा बिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यांच्याही वीजजोडण्यांची विशेष पथकांद्वारे नियमित तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये परस्पर अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडून घेतल्यास किंवा शेजाऱ्यांकडून वीज घेण्याचा प्रकार दिसून आल्यास संबंधित थकबाकीदार ग्राहक व शेजाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.