फडणवीसांवरील टीका झोंबली; भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरेंचे बॅनर टराटरा फाडले

मुंबई – गेल्या कधी दिवसांपासून राज्याचे ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष वाढला असून यात भाषेची मर्यादा देखील अनेकदा ओलांडताना नेते मंडळी दिसत आहेत. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे.

फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली. यासोबतच त्यांनी भारतीय जनता पक्षावर स्वत:चा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

दरम्यान, हि टीका केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर लावलेले पोस्टर बॅनर फाडले. यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या पोस्टरला काळे फासून निषेधही नोंदवला आहे.