सच्चा दोस्त! दणदणीत विजयानंतरही आनंदोत्सव नाही, सत्यजित तांबेच्या निर्णयाने डोळ्यात आणले पाणी

नाशिक- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा (Nashik Graduate Constituency Election) निकाल अखेर समोर आला आहे. काँग्रेसशी बंडखोरी करणाऱ्या अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyjeet Tambe) यांनी नाशिकमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना जवळपास ३० हजार मतांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले आहे.

भाजपाचा पाठिंबा असलेले सत्यजित तांबे यांचे पारडे पहिल्या फेरीपासूनच जड होते. पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबेंनी एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली आहेत. तर शुभांगी पाटील यांना केवळ ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. अशाप्रकारे शुभांगी पाटील यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी  दारूण पराभव झाला आहे. परिणामी सत्यजित तांबेंच्या विजयाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

मात्र या दणदणीत विजयानंतर सत्यजित तांबेंनी सर्वांची मने जिंकावा असा एक निर्णय घेतला आहे. मोठ्या विजयानंतरही जल्लोष साजरा न करण्याचे पाऊल सत्यजित तांबेंनी उचलले आहे. आपला जवळचा मित्र मानस पगार आपल्यात नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सत्यजित तांबेंचे जवळचे मित्र मानस पगार (32) यांचा मृत्यू झाला. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. म्हणूनच सत्यजित तांबेंनी पगार कुटुंबाच्या दु:खात सहभागी होण्याचे ठरवले.