राणेंना उद्धव ठाकरे यांनी जेवणाच्या तटावरून अटक केली तेव्हा पवारांनी समजूतदारपणाचा सल्ला का दिला नाही? 

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Eknath Shinde and party chief Uddhav Thackeray) यांच्यात कमालीचा दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत दसऱ्याच्या दिवशी नक्की शिवसेनेचा मेळावा होणार की एकनाथ शिंदे गटाचा याबाबत उलटसुलट चर्चा  सुरु आहे.

शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यासाठी शिंदे गटाच्यावतीनं मुंबई महापालिकेकडं अर्ज करण्यात आला आहे. शिंदे गटातील आमदार सदा सरवरणकर यांनी हा अर्ज दाखल केला आहे. या अगोदर शिवसेनेकडून देखील अर्ज करण्यात आला होता त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.  शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मिळवण्यासाठीचे पत्र शिवसेनेने २२ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेला पाठवले आहे. आता एकनाथ शिंदे गटानेही याच जागी दसरा मेळावा व्हावा, यासाठीचे परवानगी मागणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले असल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी, ३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला. शिवसेनेच्या वार्षिक दसरा मेळाव्यावरून संघर्षाची परिस्थिती टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. दसरा मेळाव्याशी संबंधित प्रश्नावर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी संघर्ष टाळून सर्वांना बरोबर घेऊन जावे असं सांगितले आहे.

दरम्यान, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दसरा मेळाव्याबाबत जो सल्ला दिला आहे त्यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. जेव्हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेवणाच्या तटावरून अटक केली तेव्हा समजूतदारपणाचा सल्ला आपण का दिला नाहीत, तसेच तेव्हा मुखमंत्र्यांचा झालेला अपमान सहन झाला नसल्याने ती कारवाई झाली होती, तसेच सध्या जे युवराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मनाला येईल तसा चुकीचा उल्लेख करत आहेत त्यांना पवार साहेब समजूतदारपणा दाखवण्याचा सल्ला पवार साहेब देणार का..? असा सवालही नरेश म्हस्के यांनी विचारला आहे.