Mahavikas Aghadi | महाविकास आघाडी लोकसभेच्या ४२ जागांवर विजय संपादन करणार ? 

Mahavikas Aghadi – लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसची तयारी झाली असून मित्रपक्षांबरोबरचे जागा वाटप, संघटनेची तयारी, प्रचारातील मुद्दे यांवर राज्य निवड मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, शेकाप, माकपा, वंचित बहुजन आघाडीसह एकत्रितपणे निवडणुक लढवण्याची तयारी आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सरळ सामना असून मविआ लोकसभेच्या ४२ जागांवर विजय संपादन करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीत जवळपास अडीच तास सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची संघटनात्मक ताकद आहे, त्या मतदारसंघात त्या पक्षाचा उमेदवार असेल,जागा वाटप हे मेरिटनुसारच होणार आहे, त्यात कोणतेही मतभेद नाहीत. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी अनुकुल असून  परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. शेतकरीविरोधी, तरुणांचा अपेक्षाभंग करणारे, महागाई, बेरोजगारी नियंत्रित करु न शकलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात जनतेत प्रचंड चीड आहे. काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे. महाविकास आघाडी मजबूत असून केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचणार आहे.

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदींचे हुकुमशाही सरकार शेतकऱ्यांना शत्रू, आतंकवादी समजून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करत आहेत. दिल्लीच्या खनौरी सीमेवर पोलिसांच्या गोळीबारात एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून तीन ते चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. देशाच्या पंतप्रधानाने संसदेत शेतकऱ्यांना खलिस्तानी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून अपमान केला. शेतकरी विरोधी, निर्दयी मोदी सरकारचा काँग्रेस पक्ष तीव्र धिक्कार करत आहे. भाजपा सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन, दादर येथे संपन्न झाली. या बैठकीला केंद्रीय निवड समितीचे अध्यक्ष मधूसुदन मिस्त्री, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोवा, दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आ. प्रणिती शिंदे,  AICC चे सचिव सोनल पटेल, आशिष दुआ, रामकिसन ओझा, संजय दत्त, हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अस्लम शेख, के. सी. पाडवी, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, माजी खासदार संजय निरुपम, आमदार भाई जगताप, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, NSUI चे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्जा, एस.सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिणीस प्रमोद मोरे यांच्यासह राज्य निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?