कॅप्टन रोहितच्या ‘त्या’ निर्णयावरुन भडकले सुनील गावसकर, टीम इंडियाने हाताने गमावली टेस्ट चॅम्पियनशीप!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 चा अंतिम सामना (WTC Final) इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (INDvsAUS) कसोटी चॅम्पियन होण्यासाठी आमनेसामने आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 327 धावा केल्या असून ते विजेतेपदाच्या लढतीत चांगल्या स्थितीत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवसाखेर ट्रॅव्हिस हेडने 146 आणि स्टीव्ह स्मिथने 95 धावा केल्या आहेत. भारताने 76 धावांत ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र यानंतर फलंदाजीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) वेगवान धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले आहे.

दरम्यान टीम इंडियाने रविचंद्रन अश्विनचा (R Ashwin) प्लेईंग-11 मध्ये समावेश केला नाही आणि रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeha) रूपाने केवळ एक फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरले आहेत. कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) आणि भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यात जगातील नंबर वन कसोटी गोलंदाजाला कसे बाहेर काढता येईल, असे अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंचे मत आहे.

भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी कॉमेंट्रीदरम्यान अश्विनला वगळण्याच्या टीम इंडियाच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले, ऑस्ट्रेलियन संघात पाच डावखुरे फलंदाज आहेत. यामध्ये डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. असे असूनही तुमच्या संघात एकही ऑफस्पिनर नाही? हे असे का आहे? हा निर्णय अनाकलनीय आहे. त्याचवेळी गावसकर यांच्यासोबत कॉमेंट्री करणाऱ्या हरभजन सिंगनेही गावस्करांना पाठिंबा दिला.