मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

मुंबई : मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले जात आहे. आधुनिक आणि विकसित मुंबई बनवण्यास शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आगामी काळात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला दिसेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केले.

मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Governor Bhagat Singh Koshyari, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Union Commerce Minister Piyush Goyal, Union Minister for Micro, Small and Medium Enterprises Narayan Rane, Union Minister of State for Social Justice Ramdas Athawale, Union Minister of State for Railways Raosaheb Danve,Central Panchayat Raj Minister of State Kapil Patil, Legislative Assembly Speaker Adv. Rahul Narvekar, Mumbai City District Guardian Minister Deepak Kesarkar, Mumbai Suburban District Guardian Minister Mangalprabhat Lodha, Public Works Minister Ravindra Chavan) यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जाच्या हस्तांतरणाचा प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर मेट्रो मार्गिका 2-अ आणि 7 चे लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या 20 नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, 360 खाटांचे भांडूप मल्टीस्पेशालिटी सरकारी रुग्णालय, गोरेगाव (पश्चिम) येथील 306 खाटांचे सिद्धार्थनगर रुग्णालय आणि 152 खाटांचे ओशिवरा मॅटर्निटी होम या मुंबईमधील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणीही प्रधानमंत्री  मोदी यांच्या हस्ते झाली. सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडूप आणि ओशिवरा या तीन रूग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

मोदी म्हणाले की, मुंबईसाठी अतिशय गरजेची असलेली मेट्रो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आरोग्य सेवा, रस्त्यांचे जाळे यासह प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ देण्यास शुभारंभ केला आहे.देशाची नवी ओळख जगामध्ये आता अधिक ठळक होत आहे, असे सांगून ते म्हणाले की, विकसित भारताची उत्सुकता आता केवळ देशातच नव्हे, तर जगातही आहे. भारताची अर्थव्यवस्था बळकट होत आहे. याच सकारात्मकता आणि सामर्थ्याचा उपयोग करून गतिशील विकास साध्य करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या देशात आधुनिक दळणवळणाकडे लक्ष दिले जात आहे. मुंबई हे महत्त्वाचे शहर आहे. त्याचबरोबर आगामी काळात मुंबईसह राज्यातील इतर शहरे देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे या शहरांच्या सर्वांगीण विकासाला आमचे प्राधान्य राहणार असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी स्पष्ट केले. मुंबईतील सामान्य मुंबईकरांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या विविध योजनांचे त्यांनी कौतुक केले. मुंबईच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही प्रधानमंत्री  मोदी यांनी यावेळी दिली.

रेल्वेचे आधुनिकीकरण मिशन मोडवर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेची प्रवाशांना सुविधा मिळण्याबरोबरच, त्याच ठिकाणी बस, टॅक्सी आदी सुविधाही असाव्यात यासाठी मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी हब तयार करण्यात येणार असल्याचे प्रधानमंत्री  मोदी यांनी सांगितले.