अशी औषधं बनवा ज्याने महाराष्ट्र शांत राहील आणि दगडफेक बंद होईल; अमृता फडणवीसांचा टोला

ठाणे- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या नेहमी राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत असतात. नुकत्याच जेनेरिक औषधी संबंधी एका कार्यक्रमानिमित्त अमृता फडवणीस ठाण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. तसेच बोलता बोलता त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना खोचक टोलाही लगावला.

नुकतेच संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत आपल्या जीवाला एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याकडून धोका असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.

“जेनेरिकने अशी काही औषध काढावीत ज्यानी महाराष्ट्रामध्ये शांती राहील आणि ही असली दगडफेक बंद होईल. महाराष्ट्र शांत राहील”, असा टोला अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांना त्यांच नाव न घेता लगावला आहे.

दरम्यान नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले, असा आरोप करणाऱ्या संजय राऊतांबद्दल फडणवीस म्हणाले, राजकारणात माणूस कधी वर तर कधी खाली जातो. आणि इतक निराश होऊन मनात येईल ते बोलायचं यातून त्यांच्या बुद्धीची लोकं किंव करतात. त्यांच्या बोलण्याने काही परिणाम होत नाही. संजय राऊत निर्बुद्धपणे बोलतात. अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

https://youtu.be/MGtb68M60oY