हर्षवर्धन पाटलांनंतर नवविवाहित लेकही कोरोनाच्या विळख्यात

मुंबई : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या पाठोपाठ कन्या अंकिता पाटील- ठाकरे  (Ankita Patil) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अंकिता पाटील यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे (Nihar Thackeray) आणि अंकिता विवाहबंधनात अडकले आहेत.

अंकिता पाटील यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती देताना म्हटले आहे की, आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी.असं त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कालच, माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग झाला आहे.विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. सध्या त्या आपल्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत आहेत. याला राज्यातील नेतेमंडळी हातभार लावत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय अनेक पक्षांचे छोटेमोठे कार्यक्रम देखील सुरु असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही ठिकाणी मेळावे देखील घेतले जात असल्याने सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

या नेत्यांना झाली आहे कोरोनाची लागण

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,आदिवासी मंत्री के. सी. पाडवी,ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर,खासदार सुप्रिया सुळे,आमदार सागर मेघे,आमदार राधाकृष्ण विखे पाटील,आमदार शेखर निकम, आमदार इंद्रनील नाईक,आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर),आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री दिपक सावंत,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील-ठाकरे .