भारतीय जनता पक्ष जगताप कुटुंबियांच्या पाठिशी खंबीर उभा आहे‌ – चंद्रकांत पाटील 

  पुणे – आमदार लक्ष्मणभाऊ जगताप (MLA Laxmanbhau Jagtap) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil)  यांनी आज केले. तसेच भारतीय जनता पक्ष जगताप कुटुंबियांच्या पाठिशी सदैव खंबीर उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाची पूर्वतयारी आढावा बैठक आज झाली. या बैठकीला शहर अध्यक्ष महेश  लांडगे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा नेते शंकरभाऊ जगताप, लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, आ. उमाताई खापरे, माजी महापौर माई ढोरे (Mahesh Landge, state general secretary Muralidhar Mohol, BJP leader Shankarbhau Jagtap, Laxman Bhau Jagtap’s wife Ashwini Jagtap, Mr. Umatai Khapere, former Mayor Mai Dhore) यांच्यासह पिंपरी चिंचवड मधील भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पूर्वतयारी आढावा बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नामदार पाटील म्हणाले की, "लक्ष्मणभाऊ जगताप हे जनमानसात अतिशय लोकप्रिय होते. आपल्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांनी जनमानसात आपलं वेगळं स्थान कायमस्वरूपी निर्माण केलं आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र तरीही गाफिल न राहता, पक्षाने ‘थिंक इन अँडव्हान्स थिंक इन डिटेल’मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअनुषंगाने काम सुरू केले आहे."

पाटील पुढे म्हणाले की, "चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी पक्षाने तीन समिती स्थापन केल्या असून, त्यात संघटनात्मक कामांसाठी ‌पक्षाचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्या नेतृत्वात एक समिती काम करेल. तसेच पोटनिवडणुकीच्या व्यवस्थेसाठी व्यवस्थापक प्रमुख म्हणून बापू काटे यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नामदेव ढाके हे त्यांना साहाय्यक म्हणून काम करतील. त्यासोबतच महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वात एक राजकीय समिती स्थापन केली असून, महेशदादांच्या नेतृत्वात चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ हे निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतील.

ते पुढे म्हणाले की, लक्ष्मणभाऊंच्या निधनानंतर ही भाऊंच्या कुटुंबावर सर्वांचे प्रेम कायम आहे. शंकरभाऊ आणि वहिनीं यांनीही इथल्या जनतेसोबतचं आपलं नातं अतुट ठेवलं आहे. भारतीय जनता पक्ष जगताप कुटुंबियांच्या पाठिशी खंबीर उभा आहे‌. तसेच पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पक्षाची कार्यसमिती निश्चित करते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.