आम्ही कोणाचं घर फोडलेलं नाही, आमचे तसे संस्कारच नाहीत; चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

मंत्रीपदाकरिता कुणी सोबत येत नाही. पंतप्रधान मा. मोदीजींच्या (Narendra Modi) नेतृत्त्वात डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाला साथ देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सोबत आले आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांच्या नेतृत्त्वातील आमदार हे कशासाठी एकत्र आले हे समजून घेतले पाहिजे. राजकारणात मंत्रीपदे किंवा आमदार खासदार होणे महत्वाचे नाही. कोणताही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदीजींनी मागील नऊ वर्षाच्या कार्यकाळात भारताची प्रतिमा व गरीब कल्याणाकरिता जे काम सुरू केले, त्यांनी जो संकल्प केला आहे. त्या संकल्पाला अजित पवार यांनी पाठिंबा दिला आहे.

बावनकुळे पु्ढे म्हणाले, अजित, देवेंद्र व एकनाथ शिंदे यांचा अनुभव महाराष्ट्राला विकासासाठी एक मोठे पाऊल घेतले आहे. यामुळे महाराष्ट्राचा चहुबाजूने विकास होईल, मोदीजींच्या नेतृत्त्वात वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येत देशकल्याणाकरिता एकत्र येत आहेत. मोदीजींचा विचार संपूर्ण जगाने स्वीकारला आहे. २०२४ पर्यंत मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळालेले दिसेल असेही ते म्हणाले. राष्ट्रहिता करीता आमचे कार्यकर्ते समर्पित आहेत. मोठ्या प्रमाणात आम्हला समर्थन मिळत आहे.

• जे पेरले तेच उगवले
२०१९ मध्ये फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून जो खेळ सुरू ज्यांनी सुरू केला, आज ते म्हणतात की आम्ही रस्त्यावर उतरू. ज्या दिवशी महाराष्ट्रातील जनतेने फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती बहुमत दिलं होतं त्या दिवशी तुम्ही बहुमताचा खेळ केला आणि फडणवीस आणि मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार साहेबांनी वेगवेगळ्या कृल्पत्या केल्या, जे पेरले तेच उगवले आहे.

• महाराष्ट्रात सर्वात चांगले मंत्रीमंडळ
आम्ही कोणाचे घर फोडलेले नाही. भाजपचे संस्कार कोणाचे घर फोडण्याचे नाहीत. फडणवीस यांचा महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, त्यामुळे कोणताही आक्षेप घेणे व अशा पद्धतीने संभ्रम तयार करणे हे योग्य नाही. हिंदुत्वासाठी शिंदे यांनी लढाई केली. अजित पवार आणि देवेंद्रजींसारखे नेते एकनाथ शिंदे यांच्या सरकार मध्ये आहे. हे महाराष्ट्रात सर्वात चांगले मंत्रीमंडळ आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात चांगले सरकार बनले आहे.