‘जोडे मारा किंवा माझ्या तोंडाला काळे फासा, लोक कुणाला थोबाडीत मारतील ते कळेलच’

जयंत पाटील यांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत

मुंबई  – त्या पत्रकार परिषदेत विविध पदे वाटण्यात आली. मात्र त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता होती का? असा सवाल करतानाच त्यांना कोणतीही पदे नियुक्त करण्याची मान्यताच नाही. कारण हा पक्ष आदरणीय शरद पवारसाहेबांचा आहे हे तिथे ‘किटी पार्टी’ ला बसलेल्यांनी मान्य केले असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड (Senior leader of NCP and leader of opposition Jitendra Awad) यांनी पत्रकार परिषदेत केला.

निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या संविधानातून जन्माला आलेले जे नियम व अटी आहेत त्यात अध्यक्षांना अधिकार देण्यात आले आहेत. अध्यक्षांना कोणत्याही पक्ष समितीतील सदस्यांना बडतर्फ करण्याचे, त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत.पक्षाला धोका असेल तर त्यासाठी शिस्तभंग समितीकडे प्रस्ताव पाठवला गेला पाहिजे. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले व संविधानानुसार अधिकार असल्याने शरद पवारसाहेब यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित केले आहे याबाबतचे पत्र जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.

तुम्हाला कायदेशीर नेमणूक करण्याचे अधिकार नाहीत. पत्रकार परिषदेत शरद पवारसाहेब हेच अध्यक्ष सांगत होते. मग प्रश्न उरतो नैतिकतेचा त्यामुळे शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेली कारवाई मान्य करणार की नाही?हा प्रश्न महाराष्ट्र नक्कीच विचारेल असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

जयंत पाटील यांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे त्या ९ लोकांनी कायद्याच्या अज्ञानापोटी केलेली नियुक्ती आहे त्याला अर्थ नाही. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे अजितदादांनी मान्य केले आणि इतर सगळ्यांनी मान्य केले मग राहिले काय असा सवाल करतानाच विधीमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा आहे आणि त्यात राजकीय पक्ष निर्णय घेतो. विधी मंडळ हा पक्ष नाही हे कोर्टाने शिवसेना निकालात स्पष्ट केले आहे. शिवाय सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष निर्णयावर एकनाथ शिंदेची केलेली नेमणूक अवैध आहे असा आक्षेप घेतला आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

विधानसभेतील एक गट बाहेर जातो तो पक्ष आहे सांगतो त्याला तो अधिकार नाही. आजची ‘किटी पार्टी’ होती. अशी पार्टी चालत नाही. संपूर्ण पक्ष पवारसाहेबांकडे आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार पक्ष कोणाचा आहे तर तो शरद पवारसाहेबांचा त्यामुळे नऊ जणांना त्यांची अपात्रता मान्य करावी लागेल त्यामुळे उरलेल्यांनी पवारसाहेबांना फोन करून आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे सांगण्याची संधी आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

तुम्ही मला बुध्दू समजत असले तरी पत्र देण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. त्यांनी पत्र दिले आणि मला विरोधी पक्षनेते नेमले आहे. माझ्या रक्तात गद्दारी नाही. या रक्तात शरद पवार आहेत असेही जितेंद्र आव्हाड यांनी ठणकावून सांगितले.आमची पत्रकार परिषद ‘किटी पार्टी’ नाही. त्यांना आम्हाला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही. ते व्हीप नेमू शकत नाही.त्यामुळे ८३ वर्षाच्या म्हाताऱ्याला उन्हात पावसात लढायला उभे करायचे हे माझ्या रक्तात नाही मात्र त्यांनी उभे केले त्यांना माणुसकी नाही असा हल्लाबोलही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

बहुमतावर निर्णय होत नाही. संविधानावर निर्णय होतात. त्यामुळे जोडे मारा किंवा माझ्या तोंडाला काळे फासा.लोक कुणाला थोबाडीत मारतील ते कळेलच असे सांगतानाच तुमच्याकडे फक्त भाजपची वाट आहे आणि तोच पर्याय आहे असे स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या विचारधारेच्या विरोधात जाऊन जातीय पक्षांशी हातमिळवणी केली ही गुरू दक्षिणा अपेक्षित नाही. पवारसाहेबांच्या मनात असेल तर आशिर्वाद देतील पण तो दिला नाही त्यांनी लढायला सांगितले आहे. त्यामुळे एक जरी आमदार असला तरी पक्ष आमचा आहे. तुम्ही सगळे ज्ञानी आहात आणि आम्ही वेडे आहोत का? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.