पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ, तब्बल १४ मंत्री पराभवाच्या उंबरठ्यावर

पंजाब : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे.

उत्तरप्रदेशसह सर्व देशाचे लक्ष लागलेली निवडणूक म्हणजे पंजाबची. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असे बोलले जात असताना आजच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसने निवडणुकीपूर्वी फेरबदल करत चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं होतं. काँग्रेसमधील अंतर्गत कलह त्यातही कॅप्टन अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योत सिंग सिद्धू हा वाद मिटवण्यासाठी काँग्रेसने हा उपाय केला होता. पण त्यानंतरही कलह काही थांबला नाही. नंतर सिद्धू आणि चन्नी असा वाद सुरू झाला. त्यातच अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली.

आम आमदनी पक्षाने निवडणुकी तब्बल ८९ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस फक्त १५ जागांवर आघाडी घेतली आहे. यामध्ये काँग्रेसचे १७ पैकी १४ मंत्री पिछाडीवर असून त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. खुद्द मुख्यमंत्री दोन्हीही जागांवर पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे देखील पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत.