धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक आणि मारहाण

ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शुक्रवारी (१६ जून) संध्याकाळीच्या सुमारास ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (CM Eknath Shinde) होम टाउन ठाण्यात काही महिलांकडून शाईफेक करण्यात आली. तसेच यावेळी अयोध्या पौळ (Ayodhya Paul) यांना मारहाणदेखील करण्यात आली. ठाण्यातील कळवा येथे महापुरुषांच्या कार्यक्रमानिमित्त आमंत्रण देत अयोध्या पौळ यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार करण्यात आला.  या प्रकरणी अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्याच ठाण्यात एका महिलेवर जाहीर कार्यक्रमात शाईफेक करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी संताप व्यक्त करतानाच गंभीर आरोपही केले आहेत. ठाण्यातील कळवा येथे ठाकरे गटाच्या कार्यक्रमाचा बनाव करून मला या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं होतं. मला जाणूनबुजून या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं होतं. इथे आल्यावर हा कार्यक्रम आपल्या गटाचा नसल्याची मला शंका आली. पण कार्यक्रमातून निघणं योग्य नसल्याने मी थांबले.

मला महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालण्यास सांगण्यात आले. मी महापुरुषांना हार घातले. त्यावेळी एक महिला आली आणि तिने मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा माझ्यावर आरोप केला. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकायला तयारच नव्हते. तेवढ्यात माझ्या अंगावर शाईफेक करण्यात आली. मला मारहाण करण्यात आली. मी सातत्याने सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू मांडत असल्याने मला टार्गेट करण्यात आलं. पण आम्ही अशा हल्ल्यांना भीक घालत नाही. आम्ही आमचं काम करतच राहणार, असं अयोध्या पौळ यांनी स्पष्ट केलं.