भारताच्या टी२० विश्वचषक विजेत्या गोलंदाजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, १६ वर्षांपासून होता संघाबाहेर

भारतीय क्रिकेट संघाला पहिलावहिला टी२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्मा याने शुक्रवारी (०३ फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची (Joginder Sharma Announced Retirement) घोषणा केली आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने आपल्या निवृत्तीची माहिती दिली आहे. 

३९ वर्षीय जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) याचा एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला पहिला टी२० विश्वचषक (T20 World Cup 2007) जिंकून देण्यात मोठा हात होता. त्याने टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा प्रतिद्वंद्वी पाकिस्तान संघाला शेवटच्या षटकात ५ धावांनी पराभूत केले होते. मात्र दुर्देवाने या विश्वचषकानंतर त्याला भारतीय संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. सप्टेंबर २००७ मध्ये त्याने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

त्यानंतर आता जवळपास १६ वर्षांनी जोगिंदर शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याने भारताकडून ४ वनडे सामन्यात १ विकेट आणि ४ टी२० सामन्यात ४ विकेट्सची कामगिरी केली होती.

https://twitter.com/MJoginderSharma/status/1621393735807549442?s=20&t=SudORoC83LdQeB90tngb8A

भारताकडून क्रिकेट खेळण्याच्या पुरेशा संधी न मिळाल्याने जोगिंदर शर्माने पोलिस म्हणून काम करायला सुरुवात केली. तो सध्या हरियाणा पोलिसांत हिस्सारमध्ये डीएसपी आहे. त्याचे लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर पोलिस ऑफिसरच्या वर्दीत काम करतानाचे फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले होते.