Mumbai Indians | हार्दिकला कर्णधार बनवत मुंबई इंडियन्सने आपले भविष्य सुरक्षित केले!!

Mumbai Indians | ‘नव्याचे नऊ दिवस’ ही म्हण सर्वांनी ऐकलीच असेल. ‘कोणत्याही नव्या गोष्टीचे लोक काही दिवस कौतुक करतात, मग त्याला विटतात’, असा या म्हणीचा अर्थ आहे. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीचा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आणि माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याबाबतही कदाचित असेच झाले असावे!! मुंबई इंडियन्सने २०१३ साली हिटमॅन रोहितला आपल्या फ्रँचायझीचा कर्णधार बनवले. त्यांनी १० वर्ष नव्या कर्णधाराचे सर्व लाड पुरवले. संघाचा नेता म्हणून रोहितनेही ५ वेळा आयपीएल जेतेपद जिंकून देत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. पण २०२४ च्या आयपीएल हंगामापूर्वी अचानक मुंबईने रोहितचा कर्णधारपदावरुन पायउतार केला. बरं, कुणाला कर्णधार बनवायचे आणि कुणाला कधी काढून टाकायचे, हा निर्णय पूर्णपणे फ्रँचायझीचा असतो. पण ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली आपली फ्रँचायझी आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम बनली, त्यालाच न कळवता असा निर्णय घेणं नक्कीच चुकीचं होतं! असो, पण इथे मुद्दा मुंबईने रोहितवर अन्याय केला का नाही? हा नाही. तर मुंबईने एका प्रतिभाशाली, अनुभवी कर्णधाराला (रोहित) बाजूला करत नव्या दमाच्या खेळाडूवर (हार्दिक पंड्या) विश्वास टाकून कितपत योग्य केले? हा आहे.

२२ मार्चपासून आयपीएलचा १७वा हंगाम सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व सहभागी १० आयपीएल संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी जिवाचे रान करताना दिसतील. मात्र आयपीएलप्रेमींचे सारे लक्ष मुंबई इंडियन्सकडे असेल. कारण यंदा मुंबईने दिग्गज कर्णधार रोहितचा पायउतार करत हार्दिक पंड्याला नवा कर्णधार घोषित केले आहे. हार्दिकच्या तुलनेत रोहितला नेतृत्त्वाचा मोठा अनुभव आहे. १० वर्षांत मुंबईकडून त्याने १५८ सामन्यात संघाची कमान सांभाळली असून त्यापैकी ८७ सामने जिंकले आहेत. तर ६७ सामने गमावले आहेत. यादरम्यान त्याने मुंबईला २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. गतवर्षीही त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने प्लेऑफमध्ये मजल मारली होती. पण रोहितचं वय सध्या ३६ वर्षे आहे आणि अजून तो आयपीएलचे पुढील किती हंगाम खेळेल, हे सांगणे कठीण आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

दुसरीकडे रोहितच्या तुलनेत हार्दिक (३० वय) अजून तरुण आहे. तो यापूर्वी मुंबईकडून एक खेळाडू म्हणूनही खेळला आहे. २०१५ ते २०२१ या कालावधीत मुंबईकडून ९२ सामने खेळण्याचा अनुभव त्याला आहे. त्यामुळे मुंबई संघाची खेळण्याची वृत्ती, संघातील खेळाडू यांचा त्याला चांगला अभ्यास आहे. हार्दिक एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे नेतृत्वाबरोबरच फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही संघाला त्याची मदत होईल. शिवाय गुजरात टायटन्सकडून आयपीएलमध्ये नेतृत्त्वाचाही त्याला थोडा पण वाखाणण्याजोगा अनुभव आहे. गुजरातकडून २०२२-२३ दरम्यान ३१ सामन्यात नेतृत्त्व करताना त्याने २२ सामने जिंकले आहेत. तर केवळ ९ सामन्यात संघाला पराभव पाहावा लागला होता. विशेष म्हणजे, हार्दिकने पहिल्याच हंगामात गुजरात संघाला विजेतेपदही मिळवून दिले होते. तसेच मागील हंगामातही सर्वाधिक १० सामने जिंकत गुजरातने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे अनुभवाने जरी हार्दिक रोहितपेक्षा मागे असला तरीही त्याच्यात अफाट प्रतिभा आहे. त्यामुळे मुंबईने फ्रँचायझीच्या चांगल्या भविष्याचा विचार करता घेतलेला हा निर्णय अगदी योग्य आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

पण हार्दिक मुंबईतून बाहेर झाल्यापासून संघात बरेच झाले आहेत. काही जुने सहकारी आता आयपीएल खेळत नाहीत, तर काही नवे गडी ताफ्यात दाखल झाले आहेत. मुंबईचा हुकुमी एक्का जसप्रीत बुमराह आणि प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव हेदेखील हार्दिकवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे या सर्व परिस्थितींशी स्वत:ला जुळवून घेण्याचे आवाहान हार्दिकपुढे असेल.

महत्वाच्या बातम्या :

‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, मोहोळांचा घरोघरी जाऊन प्रचार

विजय शिवतारे पुरंदरच्या भूमीत जन्माला आलेला दिलेर खान – मिटकरी

Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार, एक जागा ‘रासप’ला दिली जाणार