सचिन वाझे प्रकरण पूर्णत:बनावट, ही तर भाजपची स्क्रिप्ट; नाना पटोलेंची खोचक टीका

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरण (Mansukh Hiren murder case) आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात (Antilia Blast Case) कोठडीत असणार्‍या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा (Sachin Waze) माफीचा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. सचिन वाझेने (Sachin Vaze) १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला अटी-शर्तींसह मंजुरी देण्यात आली आहे.

या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठे वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप देखील सुरु झाले असून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही लक्ष्यवेधी वक्तव्ये केली आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरण ही भाजपची स्क्रिप्ट होती. आता वाझे माफीचा साक्षीदार बनला असून यामागे भाजपचे षडयंत्र होतं, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे.

पटोले पुढे म्हणाले, सचिन वाझे प्रकरण पूर्णत:बनावट आहे. विधानसभेचा अध्यक्ष असल्यामुळे मला याविषयी मत नोंदविता आले नाही, तेव्हा अध्यक्ष न राहता मी सदस्य असतो, तर हे प्रकरण पुढे चालूच दिले नसते. तेथेच विषय संपवला असता. वाझे प्रकरणातून राज्य मंत्रिमंडळ, महाराष्ट्राला बदनाम करण्याच काम भाजपने केलं. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरण ही भाजपची स्क्रिप्ट होती. आता वाझे हा माफीचा साक्षीदार बनला असून यामागे भाजपचे षडयंत्र होतं.