भारतात कांदा शेतकऱ्यांना रडवतोय, पण ‘या’ देशात मटणापेक्षाही महाग आहे कांदा; किंमत चक्क…

कांद्याच्या किंमतींनी (Onion Price) भारतातील शेतकऱ्यांना अक्षरश: रडवले आहे. भारतात कांद्याच्या किंमती घसरुन 20 रुपये किलो झाल्या आहेत. परंतु एक देश असा आहे, जिथे कांद्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. फिलीपिन्स (Philippines) असे या देशाचे नाव आहे. येथे एक किलो कांद्याचा भाव 900 रुपयांवर गेला आहे. तर या देशात एक किलो चिकनची किंमत फक्त चार डॉलर म्हणजेच सुमारे तीनशे रुपये आहे.

फिलीपिन्समध्ये एक किलो कांद्याची किंमत या आठवड्यात 11 डॉलर म्हणजेच जवळपास 900 रुपये झाली आहे. फिलीपिन्समध्ये कांद्याच्या दराने चिकन आणि बीफच्या किमतींनाही मागे टाकले आहे. कांद्याची ही किंमत फिलीपिन्समधील सरासरी मजुराच्या एका दिवसाच्या मजुरीपेक्षा जास्त आहे. जानेवारीच्या सुरुवातीला फिलीपिन्समध्ये $310,000 किमतीची कांद्याची खेप जप्त करण्यात आली होती. कपड्याच्या नावाखाली चीनमधून या कांद्याची तस्करी केली जात होती.

कांद्याचे भाव वाढण्याचे कारण
फिलीपिन्समध्ये कांद्याचे भाव वाढण्याची किमान दोन प्रमुख कारणे आहेत. कृषी विभागाने जारी केलेल्या कांदा उत्पादनाच्या अंदाजामुळे उत्पादन कमी झाले आणि वादळामुळे कांदा पिकाचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाले. देशात हाहाकार माजला असताना कांद्याची आयात सुरू झाली.

कांदा ही जगातील तिसरी सर्वात जास्त वापरली जाणारी भाजी
फिलीपिन्समध्ये जेवढे कांदे तयार होतात, तिथले लोक त्यापेक्षा कितीतरी जास्त कांदे खातात. इथे मिळणारे कांदे फार काळ टिकत नाहीत. कांदा ही जगातील तिसरी सर्वात जास्त वापरली जाणारी भाजी आहे. कांद्यापेक्षा फक्त काकडी आणि टोमॅटो जास्त घेतले जातात.