पुढील तीन दिवसात उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात पाऊस पडण्याचा अंदाज

नवी दिल्ली- पुढील तीन दिवसात उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्लीत काल हलका पाऊस पडला, तर काश्मीर आणि सिक्कीममध्ये जोरदार हिमवृष्टी झाली. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये उद्या पाऊस पडण्याचा अंदाज असून बुधवारपर्यंत उत्तर प्रदेशातही विविध भागांमध्ये पाऊस कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हवामान विभागानं मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा इथं आणि पश्चिम बंगालमधला गंगेच्या किनाऱ्यावरच्या भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

काश्मीरमधल्या बहुतेक ठिकाणी तापमान शून्याच्या खाली उतरलं असून पुढील दोन दिवस इथं हिमवर्षाव होण्याचा अंदाज आहे. काश्मीर खोऱ्यात सध्या तीव्र थंडीचा समजला जाणारा चिल्लई कलान हा चाळीस दिवसांचा काळ सुरु आहे.

जोरदार हिम वर्षावामुळं सिक्कीममध्ये काल रात्री चुंगू सरोवराजवळ शेकडो पर्यटक अडकून पडले होते. लष्करानं बचाव मोहीम राबवत या सर्वांची सुटका केली आणि त्यांना आपल्या छावणीत आश्रय दिला.