पुस्तकांचे वाचन हा स्वसंवादाचा उत्तम मार्ग, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांचे मत

पुस्तकांमुळे वाचकाच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. मात्र वेब सीरिज, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या कल्पना दृश्यांतून बंदिस्त केल्या जातात. पुस्तकांचे वाचन हा स्वसंवादाचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे पिझ्झा, कपडे अशा गोष्टींवरील खर्च कमी करा, पण पुस्तके विकत घेऊन वाचा, असे आवाहन प्रसिद्ध हिंदी कवि डॉ. कुमार विश्वास यांनी केले. पुस्तकांमुळे आत्म्याची इम्युनिटी वाढते. वाचलेले मनात राहते आणि कधी ना कधी कामी येते, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात कवि की कल्पना से या विषयावर डॉ. कुमार विश्वास यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रसेनजित फडणवीस या वेळी उपस्थित होते.

गेली ३५ वर्षे, ४४ देशांत रंगमंचावरून कविता सादर करत असल्याचे सांगून डॉ. कुमार विश्वास यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, की चुकीच्या गोष्टींवर भाष्य करणे हे कवीचे काम आहे. सरकारे येतील आणि जातील, पण लोकशाही टिकली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे. त्यामुळे कवींनी निर्भयपणे बोलले पाहिजे. चौथीत असताना मला लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य पारितोषिक म्हणून मिळाले होते. विनोबा भावे, ओशो अशा अनेकांनी गीतेवर उत्तम लेखन केले आहे. मात्र कर्मयोगाच्या संदर्भात टिळकांचे गीतारहस्य सर्वोत्तम आहे. चांगले असणे आणि यशस्वी असणे यात फरक आहे. त्यामुळे चांगले होण्यासाठी वाचणे आवश्यक आहे. वाचनाने माणूस चांगला होतो. प्रत्येक विषयाचे विविध आयाम समजून घेण्यासाठी विविध प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत.

आज स्वतंत्र भारताच्या ७५व्या वर्षी भारत जगातील आघाडीचे देश आहे. मात्र १००व्या वर्षी भारत आध्यात्मिक आणि आर्थिक महासत्ता होईल. व्हॉट्सअॅप, आर्ठिफिशियल इंटेलिजन्स ही माया आहे. व्हॉट्सअॅपर संदेशांचा कचरा येऊन पडत राहतो, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मानवी संवेदनांवर हल्ला होणार आहे. मात्र मानवी संवेदनाच यंत्राच्या संवेदनेपेक्षा श्रेष्ठ आहेत, असे डॉ. विश्वास यांनी सांगितले.

व्याख्यानानंतर विश्वास यांनी कोई दिवाना कहता है ही त्यांची प्रसिद्ध रचना सादर केली. त्यांचे व्याख्यान आणि सादरीकरणाला उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

तावडे म्हणाले, की कुमार विश्वास हे महत्त्वाचे कवी आहेत. त्यांनी कवींचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्यामुळे अनेक नव्या कवींना ओळख मिळाली. महाराष्ट्रात पुस्तके विकत घेऊन वाचली जातात हे साहित्य संमेलनातील पुस्तकांच्या खपांच्या आकड्यांतून कळते. त्यामुळे हा पुणे पुस्तक महोत्सव वाचकांसाठी पर्वणी आहे.

गेल्या तीन दिवसांत तीन पुस्तकांशी, वाचनाशी संबंधित तीन विश्वविक्रम पुणे पुस्तक महोत्सवात नोंदवले गेले आहेत. पुस्तकांची दोनशेपेक्षा जास्त दालने या महोत्सवात असल्याचे राजेश पांडे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न?

जान्हवी कपूर आणि नीसा देवगण ‘या’ व्यक्तीसोबत लंडनमध्ये करत आहेत सुट्या एन्जॉय

एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या केल्या, त्यामुळंचं त्यांना पक्षानं हाकलून दिलं – महाजन