ऋतुराज ऑन फायर! मराठमोळ्या गायकवाडचा विजय हजारे ट्रॉफीत द्विशतकी धमाका

अहमदाबाद: विजय हजारे ट्रॉफीतील महाराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने धडाकेबाज द्विशतक (Double Century) झळकावले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश संघात दुसरा उपांत्यपूर्व सामना पार पडला. या सामन्यात महाराष्ट्राकडून कर्णधार ऋतुराजने आतिशी खेळी केली. उत्तर प्रदेश संघाच्या गोलंदाजांचा घाम काढत त्याने शानदार द्विशतक ठोकले. त्याच्या या खेळीमुळे महाराष्ट्र संघाची धावसंख्या ३०० पार गेली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र संघाने निर्धारित ५० षटकात ५ बाद ३३० धावा केल्या. यातील अर्ध्यापेक्षा जास्त धावा एकट्या ऋतुराजने कुटल्या. १५९ चेंडूंचा सामना करताना १६ खणखणीत षटकार आणि १० चौकार मारत तो २२० धावांवर नाबाद राहिला. यादरम्यान एका षटकात ७ षटकार ठोकत त्याने विश्वविक्रमालाही गवसणी घातली.

ऋतुराजची विजय हजारे ट्रॉफीच्या २०२२ हंगामात चांगलीच बॅट तळपली आहे. त्याने या स्पर्धेत १३६ (११२), १५४* (१४३), १२४ (१२९), २१(१८), १६८(१३२), १२४* (१२३), ४०(४२), २२०* (१५९) अशा धावा केल्या आहेत.