शिवसेनेच्या एकेकाला ठोकून काढा, सोडू नका; पूनम महाजनांच्या वक्तव्याने नवा वाद

मुंबई : शिवसेनेबाबत मी मुद्दामहून बोलत नाही, असे काही जण म्हणत असतात. पण, मी बोलून आपला वेळ खर्ची घालत नाही. याचा अर्थ मी कुणाच्या बाजूने आहे, असा होत नाही. नळावर पाण्यासाठी भांडल्यासारखे ट्विटरवर भांडायचे, हे मला पटण्यासारखे नाही. शिवसेनेच्या विरोधात बोलायचे नाही, अशी सूचना मी कधीही कार्यकर्त्यांना दिली नाही. मी तर म्हणते एकेकाला ठोका, सोडू नका, असे म्हणत भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी शिवसेनेबाबत आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली.

माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात खासदार पूनम महाजन बोलत होत्या. महाजन म्हणाल्या की, महाविकास आघाडीची २०१९ मध्ये धोक्याने सत्ता आली. त्यानंतर कोरोना आला, त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात टाहो फोडायला सुरुवात केली. पण, कोरोनाकाळात फक्त भाजपचे कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीला आले होते. त्यावेळी कोणीही पुढे आले नव्हते. शिवसेनेचा शाखाप्रमुखही रस्त्यावर उतरला नव्हता. मुख्यमंत्री तर घरात बसून होते.

शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत ठाकरे (Thackeray) परिवारातील लोक भाष्य करत असतील, तर नाण्याची दुसरी बाजूदेखील महाजन परिवार सांगेल. युतीत शिवसेना सोडली, असं भाष्य ठाकरे करतात, तर महाजन परिवारही सत्य समोर आणेल. हे त्यांनी लक्षात ठेवावे,’’ असा सज्जड इशारा देखील पूनम महाजन यांनी दिला.

आत्मसन्मान हवाय पण अहंकार नको, काहींच्या डोक्यात अहंकार भरलाय अशी टीका करत भविष्यात मुद्दामून आपल्या लोकांना त्रास दिला जाईल त्याला प्रत्युत्तर द्या असं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं आहे. आपल्या मुंबईचा महापौर भाजपचाच असेल असा दावा देखील पूनम महाजन यांनी केलाय.