३५ वर्ष पाकिस्तानमध्ये नरकात गेली तरी लढायला सज्ज असणारा सच्चा देशभक्त ‘कश्मीर सिंग’ !

kashmir singh

विनीत वर्तक : गुप्तहेर बनणं आपल्याला वाटतं तितकं सोप्पं नसतं. आपलं अस्तित्व पुसून एका नव्या ओळखीसह शत्रूच्या गोटात शिरून तिथली माहिती गोळा करून पुन्हा ती आपल्या देशात पोहोचवणं हे खूप कठीण काम आहे. पकडलं गेल्यावर अस्तित्व आणि ओळख पुसली गेल्यावर कोणाकडे मदतीची काय याचना करणार? जिकडे आपलेच ओळख दाखवणार नाहीत हे स्पष्ट असते, तिकडे एकाकी लढा देण्याशिवाय पर्याय नसतो. त्यानंतर घडणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी स्वतःच घ्यायची असते. जे आयुष्य त्यानंतर वाट्याला येते त्याचा आपण विचारही करू शकत नाही.

एक, दोन नाही तर तब्बल ३५ वर्षं जर तुम्ही आकाश पाहिलं नसेल आणि सूर्याला बघितलं नसेल तर तुमची काय अवस्था होईल? ३५ वर्षांचा काळकोठडीतील अंधार फक्त जगायचा नव्हता तर एखाद्या गुन्हेगाराला ज्याप्रमाणे थर्ड डिग्री गुन्ह्यांची उकल करण्यासाठी वापरली जाते तो अनन्वित छळ ३५ वर्षं सहन करायचा? का? कशासाठी? कोणासाठी? मृत्यूसुद्धा जिकडे थांबेल आणि म्हणेल की बस झालं, आता नको अजून…. अश्या अमानवीय अत्याचाराचा सामना करून जेव्हा तुम्ही त्या नरकातून पुन्हा आपल्या देशात परत याल, तेव्हा तुमची काय इच्छा असेल ?

कदाचित तुम्ही सरकारला, आपल्या देशाला दोष द्याल. आपल्या लोकांचा तुम्हाला राग असेल की ज्यांच्यासाठी मी ३५ वर्षं नरकात घालवली आज ते याचा स्वीकार करायला पण कचरत आहेत! पण काही लोक वेगळ्या मातीची बनलेली असतात. इतकं होऊनसुद्धा जेव्हा त्या गुप्तहेराला वयाच्या ७७ वर्षी (ज्यातील ३५ वर्षं पाकिस्तानमध्ये नरकात गेली आहेत) विचारलं की पुन्हा संधी दिली तर,

“I am still ready to serve my motherland. Even if they [the Government of India] do not accept the fact that I worked for them, it doesn’t matter. I don’t regret serving my country.”

तब्बल ३५ वर्षं अंधारात जगून आणि पाकिस्तानच्या अनन्वित अत्याचाराला सहन केल्यावर व आपल्या देशाने तो गुप्तहेर असल्याचं मान्य केलं नसल्यानंतरही आपल्या मातृभूमीसाठी पुन्हा आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार असलेला भारताचा हा गुप्तहेर म्हणजेच ‘कश्मीर सिंग’!

कश्मीर सिंग यांचा जन्म १९४१ साली झाला. १९६२ ते १९६६ सालापर्यंत त्यांनी भारतीय सेनेत देशरक्षण केलं. त्यानंतर पंजाब पोलीसमध्ये काही काळ व्यतीत केल्यावर त्यांनी गुप्तहेराचं काम सुरू केलं. ४८० रुपये महिना पगारावर त्यांनी गुप्तहेर बनून त्यांनी दोन वर्षं भारतासाठी गुप्तहेराचं काम केलं. अर्थात या सगळ्या गोष्टींची कागदोपत्री कुठेच नोंद ठेवली गेली नाही. दोन वर्षात तब्बल ५० वेळा कश्मीर सिंग यांनी पाकिस्तानात जाऊन संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रं काढून ती भारतीय गुप्तचर संघटनांना दिली.

त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा भारतातील सैन्याला आणि गुप्तचर संस्थांना झाला. तब्बल दोन वर्षं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना तुरी दिल्यावर त्यांच्याच काही सहकाऱ्यांनी कश्मीर सिंग यांचं रहस्य पाकिस्तानी अधिकाऱ्यांसमोर फोडलं. पकडलं गेल्यावर त्यांनी कधीच आपण भारताचा गुप्तहेर असल्याचं मान्य केलं नाही. पण त्यांच्या सहकाऱ्यानी कोर्टात दिलेल्या साक्षीमुळे त्यांना तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा झाली. तब्बल ३५ वर्षं काळकोठडीत त्यांना डांबण्यात आलं. थर्ड डिग्रीचे अत्याचार प्रत्येक दिवशी त्यांच्यावर करण्यात आले. ३५ वर्षं दिवस न बघितलेला हा माणूस मानसिकरीत्या पूर्णपणे कोलमडला पण आपल्या देशाचं रहस्य त्यांनी आपल्या आत लपवून ठेवलं.

पाकिस्तानमधील मानवाधिकार मंत्री अन्सर बर्नी यांची नजर पाकिस्तानमधील तुरूंगात अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या ३०-३५ भारतीय कैद्यांवर पडली. त्यातील एक होते कश्मीर सिंग. त्यांची अवस्था बघून बर्नी यांनी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्याकडे कश्मीर सिंग यांची गोष्ट पोहोचवली व दयेचा अर्ज भारतीय वकील जे. सी. भारद्वाज यांच्या साह्याने दाखल केला. पाकिस्तानी राष्ट्रपतींनी तो मंजूर केल्यावर कश्मीर सिंग यांची त्या नरकातून मुक्तता करण्यात आली.

पण तोवर ना भारत सरकारने ना कश्मीर सिंग यांनी कधीच आपण गुप्तहेर असल्याचं मान्य केलं होतं. भारतात परतल्यानंतर कश्मीर सिंग यांनी आपल्या घरात आणि देशात पाय ठेवल्यावर जे रहस्य आपल्या आत गेली ३५ वर्षं लपवलं होतं त्याचा उलगडा केला. कश्मीर सिंग यांच्या कुटुंबियांना पंजाब सरकारने २००९ साली १०,००० रुपये/महिना पेन्शन सुरू केलं तसेच त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी देऊन त्यांच्या बलिदानाचा एक प्रकारे सन्मान केला.

कश्मीर सिंग हे नाव अगदी दूर दूर पर्यंत भारतीयांनी ऐकलेलं नसेल. कारण अश्या लोकांना आणि त्यांच्या बलिदानाला भारतीयांच्या लेखी किंमत नसते. देशासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलेल्या अश्या अनेक वीरांचे साहस, त्यांचा पराक्रम, त्यांची देशभक्ती ही इतिहासाच्या पानात लुप्त होत जाते. सरकार मग ते कोणत्याही देशाचं असो वा पक्षाचं ते कधीच गुप्तहेरांचं आयुष्य मान्य करत नाही.

पण अश्या पडद्यामागच्या सूत्रधारांचं आयुष्य आपण आपल्या देशापुढे आदर्श म्हणून नक्कीच ठेवू शकतो. वयाच्या ७७ वर्षीसुद्धा जर कश्मीर सिंग सरकारने दखल घेतली अथवा घेईल याची पर्वा न करता देशासाठी आजही बलिदान देण्यासाठी तयार आहेत, तर त्यांच्या त्यागाचा, देशप्रेमाचा वारसा आपण भारतीयांपुढे तरी नक्कीच ठेवू शकतो.

देशाच्या प्रेमासाठी, सुरक्षिततेसाठी तब्बल ३५ वर्षं नरकाचं आयुष्य जगलेल्या कश्मीर सिंग यांना माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार…. सर कदाचित तुमच्या देशप्रेमापुढे सगळे पुरस्कार पण खुजे आहेत. तुमच्या बलिदानाची आणि देशप्रेमाची तुलना कधीच पैश्याने आणि सन्मानाने होऊ शकत नाही. तुमचं आयुष्य जरी प्रत्येक भारतीयाने एक क्षण जगलं तरी तो तुमचा खूप मोठा सन्मान असेल. पडद्यामागच्या सूत्रधाराला पुन्हा एकदा माझा सॅल्यूट. जय हिंद !!!

Previous Post
Prabhakar Deshmukh - Ajit Pawar

प्रभाकर देशमुख हेच माण-खटावसाठी योग्य – अजित पवार

Next Post
shivendraraje

एफआरपीनुसार संपुर्ण रक्कम देणारा ‘अजिंक्यतारा’ पहिला कारखाना

Related Posts
nana patole

काँग्रेसच्या आग्रही भूमिकेमुळे ओबीसी आरक्षण संपवणाऱ्यांचे मनसुबे उधळले  : नाना पटोले

मुंबई – महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने इम्पेरिकल डेटा व ट्रीपल टेस्टची पूर्तता केल्याने ओबीसी आरक्षणानुसार स्थानिक…
Read More
'पृथ्वीवर एकच पक्ष असा आहे ज्याला आत्मपरीक्षण करता येत नाही तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष'

‘पृथ्वीवर एकच पक्ष असा आहे ज्याला आत्मपरीक्षण करता येत नाही तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष’

मुंबई – मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कचऱ्यात खाल्ले, नाल्यात खाल्ले. पालिकेत उंदीर मारण्यात घोटाळा झाला. पाच…
Read More
ICC ODI Rankings : टीम इंडिया T20 नंतर वनडेमध्ये नंबर वन बनली, न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले

ICC ODI Rankings : टीम इंडिया T20 नंतर वनडेमध्ये नंबर वन बनली, न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले

ICC ODI Rankings: नवीन वर्षात भारतीय क्रिकेट संघ एकापाठोपाठ एक आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. वर्षाच्या सुरुवातीला भारताने पहिल्या…
Read More