खळबळजनक : सचिवालयाजवळ सापडल्या २ हजारांच्या ७,२९८ नोटा, १ किलोचं सोन्याचं बिस्किट; घबाड कोणाचं?

2000 Currency Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या नोटा बदलण्यासाठी कालावधीही जाहीर करण्यात आलाय. परंतु राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दोन कोटींहून अधिक रुपयांची रोकड सापडली आहे. राज्य सरकारच्या सचिवालयाजवळ असलेल्या योजना भवनाच्या बेसमेंटमध्ये २ कोटी ३१ लाख रुपयांपेक्षा अधिकची रोकड आणि एक किलो वजनाचं सोन्याचं बिस्किट सापडलं आहे.

बेसमेंटमध्ये सापडलेल्या नोटा २ हजार आणि पाचशे रुपयांच्या आहेत. रोकड आणि सोनं कोणाचे आहेत ते अद्याप समजू शकलेलं नाही. प्रकरण समोर येताच अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे. कोट्यवधींच्या नोटा सापडल्याची माहिती समोर येताच सीएस उषा शर्मा, डीपीजी उमेश मिश्रा आणि जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषद घेतली. विरोधकांनी या प्रकरणावरून गहलोत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.