‘मराठा आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार’

Jalna Lathicharge Case : – जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. मराठा आंदोलकांचं हे म्हणणं आहे की पोलिसांनी शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं हे आहे की आधी दगडफेक सुरु झाली त्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत.

या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीने लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे.”

जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मी राज्यातील नागरिकांना देत आहे. राज्यातील मराठा आंदोलनाने लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानेच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल.

राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे. असा विश्वास देतो. अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. अशी स्पष्ट भूमिका मांडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण मराठा आंदोलकांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना केले आहे.

येथे वाचा आणखी बातम्या-

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी सांगितलं याला नेमकं कोण आहे जबाबदार

Jalna Lathicharge Case : राज ठाकरेंनी सरकारला झाप झाप झापलं; मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन