‘भरणे मामांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोड बोलुन ‘मामा’ बनवण्याचे काम केले’

पंढरपूर – उपरी ता.पंढरपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Party) वतिने लाकडी निंबोडी योजनेंतर्गत पाणी नेण्यास विरोध म्हणुन रास्तारोकोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल, पक्षाचे ता.अध्यक्ष साहेबराव नागणे, जि.कार्याध्यक्ष सचिन आटकळे, मनोज गावंधरे, बाहुबली सावळे, शहाजीनाना जगदाळे, सुशिलकुमार शिंदे, सचिन घोडके, श्रीनिवास नागणे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळेस बोलताना जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल म्हणाले, जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पळवुन नेवून पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना हिसका दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.यावेळेस बोलताना ता.अध्यक्ष सचिन पाटील यांनी पालकमंत्री हे शेतकऱ्यांची कशी दिशाभूल करत आहेत याचा पाढा वाचला एकीकडे जिल्ह्यातील योजनांना निधी मिळत नाही मात्र दुसरीकडे एका रात्रीत या योजनेला निधी कसा उपलब्ध झाला याचे गौडबंगाल काय असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी निवास नागणे, सचिन आटकळे, दत्तात्रय नागणे, मनोज गावंधरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी देखील राज्य शासनावर जोरदार हल्ला चढवला ते बोलताना म्हणाले की पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक असतात हे पालकमंत्री मात्र  जिल्ह्याला कुपोषित ठेवत आहेत. पालकमंत्र्यांकडुन जिल्ह्याचा अपेक्षाभंग झालेला आहे. भरणे मामांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गोड बोलुन ‘मामा’ बनवण्याचे काम केले आहे त्यांना जिल्ह्यातील शेतकरी निश्चित हिसका दाखवतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.