सुरेश द्वादशीवारांनी साहित्यक्षेत्र नासविले ; भाजपचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांची विखारी टीका

नागपूर – मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळविण्याआधी आपल्या नावाची चर्चा साहित्य वर्तुळात व्हावी यासाठी हीन दर्जाची वक्तव्ये करणे व वाद निर्माण करून स्वस्त प्रसिद्धी मिळविणे हाच सुरेश द्वादशीवार यांच्या वक्तव्याचा हेतू असून अशा प्रसिद्धीच्या हावरटपणापायी त्यांनी आपले अज्ञान उघड केले आहे, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेश सचिव ॲड धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.

ललित साहित्याचे बहुसंख्य लेखक उच्चवर्णीय होते व त्यामुळे त्यांच्यावर सावरकर विचारांचा पगडा होता, म्हणून ते गांधीविरोधी होते असा जावईशोध लावून साहित्त्यक्षेत्रात नवा वर्णद्वेष द्वादशीवार निर्माण करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शाळेत सरस्वतीपूजन नको म्हणणारे भुजबळ आणि सावरकरद्वेषापोटी साहित्यक्षेत्रात प्रदूषण करणारे द्वावादशीवार यांची वैचारिक जातकुळी एकच आहे, असेही ते म्हणाले. या हीन विचारसरणीतून त्यांनी गांधी व सावरकर या महामानवांचा अपमान तर केला आहेच, पण साहित्यक्षेत्रातील हिडीस मनोवृत्तीचे प्रदर्शनही घडविले आहे. संमेलनाध्यक्षपदावर अशा सडक्या मानसिकतेच्या सुमार लेखकास स्थान द्यावे का याचा संमेलनाचे मतदार नक्कीच गंभीरपणे विचार करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या वादामुळे द्वादशीवारांचे साहित्यक्षेत्रात योगदान किती याचे मोजमापही करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. सावरकरांवर टीका करण्याच्या अतिउत्साहात या सुमार लेखकाने न्यायालयांचाही अपमान केला असून त्याबद्दल द्वादशीवारांनी बिनशर्त दिलगिरी व्यक्त करून आपली विधाने मागे घ्यावीत तसेच संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवारीतून माघार घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली.