ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या अडचणी वाढणार, केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये

मुंबई –  ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush directed by Om Raut) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात निराशा झाल्याचं दिसत आहे. या चित्रपटात दाखवल्या गेलेल्या दृश्यांवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. अगदी राजकीय वर्तुळातूनही या चित्रपटावर प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसबरोबरच भाजप आणि आरएसएसनेही टीका केली आहे.

परिणामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून देशभरात वाद झाल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. चित्रपटाचे संवाद पुन्हा लिहिण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) यावर योग्य ती कार्यवाही करत आहे.

दुसरीकडे सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि सीबीएफसीचे सदस्यही संभ्रमात आहेत की, मनोज शुक्ला मुंतशीर यांच्यावर सरकारच्याच बड्या लोकांचा वरदहस्त असताना त्यांच्यावर कारवाई कशी करायची?