…तर भाजपमध्ये विलीन व्हा, बाबूश मोन्सेरात यांच्या वक्तव्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ !

पणजी : गोव्यात भाजपला विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 20 जागा मिळाल्या आहेत. 3 अपक्ष आमदारांनी साथ दिल्याने सत्तास्थापनेसाठी भाजपचा मार्ग सुकर झाला आहे. मगोपनेही भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. मात्र मगोच्या पाठिंब्यावरुन भाजपमध्ये दोन गट पडल्याचं चित्र आहे. यातच आता भाजप नेत्यांनी मगोपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. आता बाबूश मोन्सेरात यांनी मगोपबाबत नवं वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

पणजीतील भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मगोपला थेट आव्हानच दिलं आहे. जर महाराष्ट्रवादी गोमन्तक पार्टीला सरकारला बळ द्यायचं असेल किंवा स्थिर सरकार हवं असेल तर त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावं असं आव्हानच बाबूश यांनी सुदिन ढवळीकरांनी दिलं आहे. तसंच भाजपला मगोपचा पाठिंबा घेण्यास विरोध दर्शवला आहे. मगोपचा पाठिंबा घेतल्याने भाजपला नुकसान होणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

एखाद्यामुळे पक्षाचं नुकसान होत असेल तर त्याला सोबत घेणं चुकीचं आहे. मगोपची आणि भाजपची व्होट बँक एकच आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन कशाला त्यांना मोठं होण्यात आपण मदतनीस व्हावं, असा प्रश्नही बाबूश मोन्सेरात यांनी उपस्थित केला आहे. मगोपला सोबत घेण्यास फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्यासह 4 आमदारांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे किंगमेकर होण्याची स्वप्न पाहणाऱ्या मगोपसमोर आता मोठा पेच उभा राहिला आहे.