‘आय रिपीट, जे उखडायचे ते उखडा, आता देश पाहील शिवसेना काय आहे’

मुंबई : एकेकाळचे कट्टर मित्र असलेले भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आता भाजपला थेट शिंगावर घेण्याचे ठरवलेलं असतानाच उद्या ४ वाजता यासंदर्भात मुंबईतील शिवसेना भवनात एका पत्रकार परिषदेचे या आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आता भाजप-शिवसेना संघर्षाचा एक नवा अध्याय सुरु होण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यात त्यांनी संजय राऊत, अनिल परब आणि स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील फैलावर घेतलेले आहे. या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत कमालीचे आक्रमक झालेले पाहायला मिळाला.

उद्या शिवसेना भवनात शिवसेनची पत्रकार परिषद होणार आहे. मी या पत्रकार परिषदेत असेलच पण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेत असतील. शिवसेना आणि ठाकरे परिवारावर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. असं संजय राऊत म्हणाले आहेत.

तर, हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल असं ते सांगत आहेत. अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जातील असंही वारंवार सांगितलं जात आहे. पण तुम्हाला सांगतो, भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील. आय रिपीट. आता बस्स झालं. राजकीय मर्यादांचं उल्लंघन तुम्ही केलं आहे. आता तुम्हाला कळेल काय असतं ते. हमाम में सब नंगे होते है, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. भाजपचे कोण नेते तुरुंगात जातील यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर, एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा, असा इशाराच त्यांनी दिला.

दरम्यान, शिवसेना हे महाराष्ट्राचे पॉवर केंद्र आहे. त्याच ठिकाणी बसून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्य आणि देशाला दिशा दिली. त्याच शिवसेना भवनात उद्या 4 वाजता पीसी होईल. मी असेलच. पण ही पत्रकार परिषद शिवसेनेची असेल. आमदार, खासदार आणि मंत्री असतील. संपूर्ण देश उद्या ऐकेल. काय होतंय हे उद्या पाहा. आम्ही खूप सहन केलंय आता बर्बादही करणार, असं संजय राऊत म्हणाले.