Kisan Sabha : राज्यव्यापी कापूस सोयाबीन परिषदेसाठी मधुरा स्वामीनाथन उपस्थित राहणार

अखिल भारतीय किसान सभेच्या (Kisan Sabha) नेतृत्वाखाली बीड ()Beed जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी राज्यव्यापी कापूस, सोयाबीन परिषदेचे दिनांक 7 मार्च 2024 रोजी भव्य आयोजन करण्यात आले असून, या परिषदेसाठी डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कन्या व शेती प्रश्नाच्या अभ्यासक डॉ. मधुरा स्वामीनाथन तसेच अखिल भारतीय किसान (Kisan Sabha) सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे (Ashok Dhavale) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी व कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव सातत्याने पाडले जात आहेत. कापूस व सोयाबीनचे भाव अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे महाराष्ट्रभरातील शेतकरी हैराण झाले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडे कापूस व सोयाबीनच्या रास्त भावासाठी हस्तक्षेप करण्याची वारंवार मागणी करूनही या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. ई.डी. व सी.बी.आय. चा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना जेरीस आणत पक्ष फोडणे व येऊ घातलेल्या निवडणुकांची तयारी करणे यापलीकडे कशातही लक्ष देण्याची सत्ताधारी शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारची इच्छा नाही.

राज्यात बहुतांशी परिमंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला, मात्र दुष्काळग्रस्त जनतेला अद्याप कोणतीही ठोस मदत करण्यात आलेली नाही. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अग्रीमची रक्कम काही जिल्ह्यांमध्ये जाहीर झाली, मात्र बहुतांश ठिकाणी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडांना याबाबतही पाने पुसली. पीक कापणी प्रयोगानंतर देय असलेल्या नुकसानभरपाईबाबत सुद्धा पीक विमा कंपन्या चालढकल करत आहेत आणि शेतकऱ्यांना भरपाई नाकारत आहेत. राज्य व केंद्र सरकार मात्र या सर्व प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

केंद्र सरकारने नुकताच डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्यासाठी एकीकडे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करायचा व त्यांनी शेतकऱ्यांना शेती संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याच्या शिफारशीला व राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या इतर शिफारशींना मात्र गुंडाळून ठेवायचे. उलट डॉ. स्वामीनाथन यांनी सुचवलेल्या दीडपट हमीभावाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर ड्रोनने अश्रुधूराची फवारणी करत लाठीचार्ज आणि गोळीबार करायचा, असे दुटप्पी व निंदनीय धोरण भाजपचे सरकार राबवित आहे.

कापूस व सोयाबीन परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातील शेतकरी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एकवटणार असून शेती अरिष्टाची झळ पोहोचलेल्या मराठवाड्याचे केंद्र असलेल्या बीड येथून सरकारच्या धोरणांच्या विरोधात एक जबरदस्त शेतकरी एल्गार सुरू करणार आहेत.

स्वामिनाथन आयोगाच्या शेतकरी हिताच्या शिफारसींची त्वरित अंमलबजावणी करा, टिकाऊ तसेच नाशवंत शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट किमान हमी भाव द्या, सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ८,०००/- रुपये हमीभाव द्या, कापसाला प्रति क्विंटल किमान ११,०००/- रुपये हमीभाव द्या या मागण्या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

राज्यभरातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी या परिषदेला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे व शेतकरी एकजूट मजबूत करावी असे आवाहन किसान सभेच्या राज्य कौन्सिलने केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Pune Loksabha Election | खासदार म्हणून पुणेकरांची पसंती कोणाला? माध्यमांच्या सर्व्हेत ‘हे’ नाव आघाडीवर

‘कोणत्या मायमाउलीकडून तू कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, माझ्याकडे पुरावे’, अजय बारसकर यांचे जरांगेंवर पुन्हा गंभीर आरोप

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना ‘नारळ’? चौथ्या टप्प्यात बदली होणार असल्याची चर्चा