महाविकास नव्हे महाविनाश आघाडी; खासदार विनय सहस्रबुद्धे यांची टीका

पुणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही धोरण स्पष्टता नाही, कारभारात समन्वय नाही, एकमुखी नेतृत्व नाही, आणि राज्यकारभार चालवण्यासाठी एकसंध टीम नाही. त्यामुळे या आघाडीचे नाव जरी महाविकासआघाडी असले तरी प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षाचा कारभार बघता महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महाविनाश आघाडी म्हणून सिद्ध झाली असल्याची टीका खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीच्या दोन वर्षांच्या पूर्ततेवर भाजपची भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सहस्रबुद्धे बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पश्चिम महाराष्ट्र प्रसिध्दी प्रमुख संजय मयेकर, शहर सह प्रसिद्धी प्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर, प्रशांत कोतवाल उपस्थित होते.

सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, ‘या सरकारचा कारभार बघताना महाराष्ट्राची जनता ही आज हतबल झाली आहे. अनुनयवादाची कास आणि गुन्हेगारांना संरक्षण हा एकमेव कार्यक्रम घेऊन हे सरकार आज काम करताना दिसत आहे अमरावती आणि इतर ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. २०१२ मध्ये मुंबईत निघालेला मोर्चा आणि त्यावेळी तिथे हुतात्मा स्मारकावर झालेला हल्ला, त्याची मोडतोड या सगळ्या घटनांची राज्यातील जनतेला पुन्हा आठवण व्हावी अशा प्रकारचा हा अमरावतीचा सगळा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसा कारभार करण्यामध्ये महा विकास आघाडीचे सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे.’

सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, ‘परकीय गुंतवणूक, महिला सुरक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा अन्य आरोग्य विभागाच्या परीक्षांचे नियोजन, विद्यार्थ्यांचे प्रश्न, एसटी कामगारांचे प्रश्न, पिक विमा संदर्भात सरकारची कार्यवाही या सर्व विषय महा विकास आघाडी सरकारने पूर्णपणे गोंधळ निर्माण केलेला आहे. महीला अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी शक्ती बिल आणणार अशा प्रकारची घोषणा झाली होती ते येणार त्याच्या बद्दलची कुठलीही चर्चा सरकारचे नेतृत्व करणारे करत नाहीत. फडणवीस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त जनतेसाठी जो शासनादेश काढला होता त्यात आघाडी सरकारने कपात केल्याचे दृश्य आहे. या सरकारच्या नेत्यांनी पूर्वी एसटीच्या कामगारांबद्दल खूपच संवेदनशील पद्धतीने मांडणी केली होती ती मांडणी विस्मरणात गेल्याच. शिवसेनेने आपली हिंदुत्वाची भूमिका बाजूला ठेवली परंतु नवीन कोणती भूमिका घ्यायची हे अजून ठरत नाही. सत्तेचे व्यसन लागलेले तिघेजण एकत्र येऊन आज सत्ता उपभोगत आहेत परंतु त्यातून महाराष्ट्राच्या जनतेची कुठल्याही प्रकारचा बदल होताना दिसत नाही ही वास्तविकता आहे ते लोकांसमोर ठळकपणे राज्यातील जनतेच्या लक्षात आले आहे. हे सरकार संपूर्णपणे अंतर्विरोधाने ग्रस्त असून आज सरकार म्हणून यांचे अस्तित्व राहिलेले नाही.’