Maratha Reservation | मनोज जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या  मान्य झाल्या ?

Manoj Jarange Patil, Maratha Reservation: महाराष्ट्रात आरक्षणासाठी मराठा आंदोलन संपवण्याची घोषणा करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या महायुती सरकारने मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या? त्यातील कोण-कोणत्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर त्या मागण्यांबद्दल जाणून घ्या…

मनोज जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या  मान्य झाल्या ?

– नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.

– राज्यभरात ५४ लाख नाही तर ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. आतापर्यंत ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. याचा डेटा आम्हाला द्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली.

– शिंदे समिती रद्द करायची नाही, ही मनोज जरांगे यांची मागणी मान्य झाली. सरकारने दोन महिने मुदत वाढवली. तसेच समितीची मुदत आणखी टप्प्याने वाढवणार असल्याचे सरकारने मान्य केले आहे.

– सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही, अशी मनोज जरांगेंची मागणी होती, ती सरकारने मान्य केली.

– ज्या महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे कुणबीची नोंद नाही, त्या बांधवांनी शपथपत्र करुन द्यायचे आहे. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचे आहे. हे शपथपत्र १०० रुपयांना आहे. परंतु ते मोफत देण्याचे मान्य केले.

– अंतरवाली सराटीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या, त्यासाठी गृहविभागाने पत्र द्यावे, अशी मनोज जरांगेंची मागणी होती. ती देखील मान्य करण्यात आली.

– मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही. जर भरती केलीच, तर आमच्या जागा राखीव ठेवा, अशी मागणी मनोज जरांगेंनी यांनी केली होती. ही मागणी सुद्धा सरकारने मान्य केली आहे.

– क्युरेटिव पिटीशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे ही मागणी मान्य झाली.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलीस जवानांना शौर्य पदके

कारागृह विभागातील ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर

अजित पवार यांनी आपल्या मुलाला समजावलं पाहिजे; खडसेंनी थेट अजितदादांना फटकारले