इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं? ‘मनसे’चा राज्य सरकारला गंभीर इशारा

MNS Criticize Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत (Mahayuti) घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, फडणवीस यांनी परस्पर अजित पवारांना हे पत्र न देता ते सार्वजनिक केले आहे. याचाच दाखला देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारला फटकारलं आहे.

मनसे अधिकृत (MNS Adhikrut) या सोशल मॅडिया प्लॅटफॉर्मवरून एक फोटो शेअर करत ‘मनसे’नं सरकारला इशारा दिला. मनसेनं शेअर केलेल्या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्हीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसेच मंत्री छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल दिसत आहेत. “इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड? ‘नवाब’चा ‘जवाब’ द्या किंवा नका देऊ पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या ‘नकाब’चा ‘जवाब’ मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल नाहीतर जनता अगदी योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल”, अशा शब्दांत मनसेनं सरकारला इशारा दिला.