भाजपच्या काळातील सगळ्याच योजना नावं ठेवण्यासारख्या नव्हत्या – राजू शेट्टी

कोल्हापूर – महाविकास आघाडी सरकारला लवकरच मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकरी विरोधी अनेक निर्णय घेतले जात असल्याचा आरोप होत असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता दिसू लागली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले. एबीपी माझासोबत संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी थेट महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.  आमच्या पाठिंबा देण्यामुळे किंवा न देण्यामुळे सरकारच्या स्थैर्यावर काही परिणाम होणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमध्ये राहिली काय किंवा नाही काय? सरकारला काही फरक पडत नाही असा खोचक टोला राजू शेट्टी यांनी लगावला. तसंच भाजपच्या काळातील सगळ्याच योजना नावं ठेवण्यासारख्या नव्हत्या, असंही ते म्हणाले.

महाविकास आघाडीचा नेता निवडताना सूचक म्हणून माझं नाव त्यांना का घ्यावंसं वाटलं? कारण स्वाभिमानीनं अनेक वर्षांपासून जे नैतिक अधिष्ठान टिकवलं आहे, ते त्यांना सरकारसोबत हवं होतं. पण आज धोरणात्मक निर्णय घेताना तुम्ही आम्हाला बेदखल करत असाल, या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत असेल आणि समोरून लोक म्हणत असतील की तुमचं सरकार असून तुम्हाला रस्त्यावर उतरावं का लागतंय? तर यावर आम्हाला चर्चा करणं आवश्यक वाटतंय”, असं राजू शेट्टी यावेळी म्हणाले.