महिला आयोगाकडून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांना नोटीस, रुपाली चाकणकरांची माहिती

मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्यावरुन भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chkankar) या आमनेसामने आल्या आहेत. चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उर्फीच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणा-या महिला आयोगाने ट्वीटरवरील बातमीवरून मराठी वेबमालिका ‘अनुराधा’च्या अश्लील पोस्टरची स्वाधिकाराने दखल घेत तातडीने अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस बजावली. मात्र आयोगाला उर्फीचे कृत्य व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग वाटते, यावरून आयोगाची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

आता यावर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आज संध्याकाळी ४ च्या सुमारास पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचे (Rupali Chakankar on Chitra Wagh) सांगितले आहे. तसेच महिला आयोगातर्फे चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर म्हणाल्या, “भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय की, राज्य महिला आयोगाने मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला पत्र पाठवले आहे. परंतु राज्य महिला आयोगाने तेजस्विनीला कोणतेही पत्र पाठवलेले नसून दिग्दर्शक संजय जाधव यांना पत्र पाठवले आहे. दिग्दर्शक म्हणून अनुराधा वेब सीरिजची भूमिका त्यांनी मेलद्वारे सादर केले आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांनी दिलेली माहिती पूर्णपणे चुकीची आहे.”

“तसेच चित्रा वाघ यांनी म्हटलंय की, तेजस्विनी पंडित महाराष्ट्राची लेक असल्याने तिला पत्र पाठवलंय. परंतु महिला आयोग उर्फी जावेदला पत्र पाठवत नाही. समाजात तेढ निर्माण करण्याचे काम महिला आयोग करतंय, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महिला आयोग गेल्या ३० वर्षांपासून काम करतंय. आयोगाची गरिमा फार मोठी आहे. अनेक कतृत्त्ववान स्त्रियांनी या आयोगासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे स्वतच्या प्रसिद्धीसाठी, स्वतच्या आकसापोटी चित्रा वाघ यांनी जी भूमिका घेतलीय, त्यासाठी आम्ही त्यांना नोटीस पाठवली आहे”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. यामुळे आता चित्रा वाघ यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.