… तुम्हाला कोणतंही राजकीय भविष्य नाही हे लक्षात असू द्या; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री सदाभाऊ खोत विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला असल्याचे दिसून येत आहे. यातच आता खासदार शरद पवार यांच्यावर खोत यांनी आज तोफ डागली आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) आयुष्यभर फक्त काड्या लावायचे काम केले. त्यांचे आडनाव आगलावे करा, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. ते सोलापूरमध्ये आले असता बोलत होते.

सदाभाऊ म्हणाले की, शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. मात्र, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे काम केले. पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले आहे. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे. हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, खोत यांनी केलेल्या या टीकेमुळे अवघी राष्ट्रवादी त्यांच्यावर तुटून पडली आहे. पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांनी खोत यांना फटकारले आहे. ते म्हणाले, सदाभाऊ खोत , गोपी पडळकर ज्येष्ठ नेते पद्मविभूषण शरदरावजी पवार साहेबांवर भान ठेवून टीकाटिप्पणी करावी. वैचारिक , तात्विक टीका जरूर करावी. मात्र सभ्यता नीतिनियम सोडून तुम्ही काहीही बाष्कळ बडबड करायचे बंद करावे. जरा स्वतःच्या जिभेला लगाम घालावा. तुमचे भाषेवरून तुमची संस्कृती जनतेला कळते आहे त्याचमुळे तुम्हाला कोणतंही राजकीय भविष्य नाही हे लक्षात असू द्यावे. असं त्यांनी म्हटले आहे.